- राज्य
- मराठा एन्त्रेप्रेनेऊर असोसिएशनच्या वतीने ‘लोन आणि सबसिडी एक्स्पो-2025’ चे आयोजन
मराठा एन्त्रेप्रेनेऊर असोसिएशनच्या वतीने ‘लोन आणि सबसिडी एक्स्पो-2025’ चे आयोजन
पण्यातील उद्योजकांना मिळणार शासकीय आणि बँकांच्या विविध योजनांचा लाभ
पुणे: प्रतिनिधी
पुण्यातील उद्योजक आणि स्वतंत्र व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योजकांना विविध शासकीय योजना, बँकांच्या योजना, वित्तीय संस्था देत असलेल्या योजना आणि शासकीय अनुदानाच्या योजना याबाबत माहिती देण्यासाठी आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी मराठा एन्त्रेप्रेनेऊर असोसिएशनच्या वतीने पुण्यात पहिल्यांदाच ‘लोन आणि सबसिडी एक्सपो-2025’ चे शुक्रवार दिनांक 25 रोजी, सकाळी 10 ते सायं 7 पर्यंत,सिद्धी बँक्वेट,डीपी रोड,पुणे येथे आयोजन करण्यात आले आहे.सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य असणार आहे.अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष विक्रम गायकवाड, सचिव सई बहिरट पाटील, उपाध्यक्ष नितीन भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला माजी अध्यक्ष अरुण निम्हण,उपाध्यक्ष विजय गवारे, प्रमोद साठे,खजिनदार राजेश कुराडे, कार्यकारिणी सदस्य आश्रम काळे आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमामध्ये आघाडीच्या पुणे पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक, एमएससी बँक, फेडरल बँक, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, कॉसमॉस बँक, विद्या सहकारी बँक, लोकमंगल बँक,एचडीएफसी बँक, महानगर बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ महाराष्ट्र, क्रिसिल, मेडा, अण्णासाहेब पाटील महामंडळ अशा शासकीय व खाजगी बँका, वित्तीय संस्था, उद्योजकांना अनुदान देणाऱ्या शासकीय व अन्य संस्था यांच्याशी एका छताखाली उद्योजकांना चर्चा करून आपल्या उद्योगांना लाभ मिळवून देता येणार आहे.
या उपक्रमामध्ये संस्थेचे सदस्य, विविध शासकीय, खाजगी व सहकारी बँकांचे अधिकारी सहभागी होणार असून यामध्ये उद्योजकांसाठी विविध शासकीय योजना, त्यासाठी राष्ट्रीय व सहकारी बँकांची होऊ शकणारी मदत याबद्दल माहिती चर्चासत्राद्वारे दिली जाणार आहे. त्याचप्रमाणे या उपक्रमात उद्योजकतेला प्रोत्साहन देणारे विविध शासकीय विभाग, शासकीय खाजगी व सहकारी बँका यांचे स्टॉल उपलब्ध असणार आहेत. त्याद्वारे उद्योजकांना अथवा उद्योग करू इच्छिणाऱ्यांना विविध शासकीय व इतर योजनांची माहिती उपलब्ध होणार आहे.
त्याचप्रमाणे या उपक्रमात बँकांनी उद्योगांसाठी उपयुक्त असलेल्या जप्त केलेल्या मालमत्ता,यंत्रसामग्री आणि औद्योगिक जागा यांची माहिती देणारे आणि त्यासंबंधी व्यवहार करणारे स्टॉल उपलब्ध असणार आहेत.
मराठा एन्त्रेप्रेनेऊर असोसिएशन ही 16 लोकांच्या सहभागाने सन 2014 मध्ये स्थापन झालेली संस्था असून तिचा वेगाने विस्तार होत आहे. सध्या या संस्थेत 800 पेक्षा अधिक मराठा उद्योजकांचा सहभाग असून त्यापैकी 110 पेक्षा अधिक महिला उद्योजकांचा समावेश आहे. या संस्थेने पिंपरी चिंचवड या औद्योगिक विभागात विस्तार केला असून या विभागातही 200 पेक्षा अधिक संस्थेचे सदस्य आहेत. परस्पर सहकार्यातून व्यवसाय वाढीसाठी मदत करणे हे या संस्थेचे मुख्य ध्येय आहे.