'अजित पवार यांनीच कृषी मंत्री पदाची जबाबदारी घ्यावी'
शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचे आवाहन
मुंबई: प्रतिनिधी
अधिवेशन काळात विधिमंडळात मोबाईलवर रमी खेळत असल्याचा आरोप असलेल्या कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनामेच्या मागणीने जोर धरलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच कृषी मंत्री पदाची जबाबदारी घ्यावी, अशी मागणी केली आहे.
अधिवेशन काळात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे विधिमंडळात बसून मोबाईलवर रमी खेळत असल्याचा व्हिडिओ रोहित पवार यांनी प्रसिद्ध केला. त्यानंतर ते टीकेचे लक्ष्य झाले असून त्यांच्या राजीनामाच्या मागणीने जोर धरला आहे. त्यातच रोहित पवार यांनी अजित पवार यांना कृषी मंत्री पदाची धुरा सांभाळण्याचे आवाहन केले आहे.
माणिकराव ठाकरे हे आपल्या वादग्रस्त विधानांसाठी कायमच चर्चेत राहिले आहेत. त्यांच्यावर रमी खेळण्याचा आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, त्यानंतर देखील माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडताना आपल्याला रमी खेळताच येत नसल्याचा दावा केला आहे. त्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सरकारची भिकारी म्हणून संभावना केली आहे. वारंवार वादग्रस्त विधाने करून देखील त्यांना पक्ष नेतृत्वाकडून अभय मिळत असल्याची चर्चा आहे.
या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी, किमान कृषी खाते कोकाटे यांच्याकडून काढून घेण्यात यावे आणि त्याची जबाबदारी अजित पवार यांनी घ्यावी, असे आवाहन पवार यांना केले आहे. सध्याच्या काळात सत्तारूढ भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षाचे नेते स्वतःला काहीही समजत आहेत. अजित पवार हे एका पक्षाचे प्रमुख झाले आहेत. अजित पवार यांचा निश्चितपणे स्वतःवर ताबा आहे. मात्र, त्यांचा आपल्याच पक्षाच्या आमदारांवर ताबा नाही का, अशी शंका उद्भवण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे, असेही रोहित पवार यांनी नमूद केले.