- राज्य
- मराठी येत नाही म्हणून मारहाण नव्हे तर...
मराठी येत नाही म्हणून मारहाण नव्हे तर...
राज्यपालांच्या वक्तव्यानंतर शिवसेना आणि मनसे कडून तिखट प्रतिक्रिया
मुंबई: प्रतिनिधी
आजपर्यंत कोणत्याही अमराठी माणसाला मराठी समजत नाही किंवा बोलता येत नाही म्हणून मारहाण झालेली नाही तर त्याने मराठीचा अपमान केला म्हणून त्याला धडा शिकवण्यात आला आहे, असे स्पष्टीकरण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मुंबई प्रमुख संदीप देशपांडे यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिले आहे. बाहेरचे गुंतवणूकदार महाराष्ट्रात गुंतवणूक करणार असतील आणि त्यात मराठी माणसांना नोकऱ्या मिळणार नसतील तर ती गुंतवणूक काय चाटायची का, अशी तिखट प्रतिक्रिया देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
हिंदी सक्ती आणि मराठी अस्मिता याच्यावरून सध्या राज्यात वाद सुरू झाला असून त्यात राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक आहे. त्यांना आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची साथ मिळाली असून या मुद्द्यावर तब्बल 19 वर्ष दूर असलेले ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. महाराष्ट्रात राहणाऱ्या, उद्योग, व्यवसाय, नोकरी करणाऱ्या प्रत्येकाला मराठी आली पाहिजे, असा मनसे आणि शिवसेनेचा आग्रह आहे. त्यावरून मराठी न येणारे अथवा न बोलणाऱ्या अमराठी नागरिकांना मारहाणीचे प्रकारही घडले आहेत.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी रामकृष्णन हे देखील या वादात उतरले आहेत. भाषेच्या मुद्द्यावरून समाजात द्वेष उत्पन्न करणे अयोग्य असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. मराठी न समजणाऱ्या अथवा न बोलू शकणाऱ्या माणसाला मारहाण केल्यानंतर लगेचच तो घडाघडा मराठी बोलू शकेल का? मराठीच आग्रह धरून दहशत निर्माण केल्याने बाहेरचे गुंतवणूकदार राज्यात गुंतवणूक करतील का, असे सवाल त्यांनी केले आहेत.
राज्यपालांच्या या भूमिकेवरून या वादाला अधिकच हवा मिळाली आहे. राज्यपालांच्या या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी खुद्द राज्यपालांना, राजकीय विधाने करू नयेत, असे सुनावले आहे. राज्यपालांसमोर सध्या अनेक महत्त्वाचे विषय आहेत. राज्यातील काही मंत्री बुक्क्या मारत आहेत तर काही मंत्री बनियन घालून फिरत आहेत. राज्यपालांनी आधी त्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले.
आजपर्यंत राज्यात कोणालाही मराठी बोलता येत नाही किंवा समजत नाही म्हणून मारहाण करण्यात आलेली नाही. मराठीचा धडधडीत अपमान करणाऱ्यांना योग्य तो धडा शिकवण्यात आला आहे, अशा शब्दात मनसे नेते संदीप देशपांडे यांनी राज्यपालांच्या विधानावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याचप्रमाणे परराज्यातील अथवा परदेशातील गुंतवणूकदार महाराष्ट्रात गुंतवणूक करून त्यांच्या उद्योगात मराठी माणसांना नोकऱ्या मिळणार नसतील तर त्या गुंतवणुकीला काय चाटायचे का, अशी तिखट प्रतिक्रिया ही त्यांनी व्यक्त केली.
सत्तेत असलेल्या शिवसेना शिंदे गटाकडून देखील राज्यपालांच्या विधानाबाबत प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे. शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले की, राज्यपाल हे या राज्याचे प्रथम नागरिक आहेत. त्यांनी मराठीचा सन्मान करणे आवश्यक आहे. ज्यांना मराठी येत नाही असे अनेक जण महाराष्ट्रात येऊन उत्तम मराठी शिकून जातात, असेही त्यांनी नमूद केले.
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी येणे आवश्यकच आहे. मात्र, मराठी येत नाही म्हणून मारहाण करणे अयोग्य आहे. त्यांना आपली भूमिका व्यवस्थित समजावून सांगितली पाहिजे, असे मत आमदार पंकज भोईर यांनी व्यक्त केले.