- राज्य
- आधुनिक व्हा पण संस्कार सोडू नका: मीनाक्षी सेहरावत
आधुनिक व्हा पण संस्कार सोडू नका: मीनाक्षी सेहरावत
उदयपूर महाराणी निवृत्ती कुमारी यांच्या उपस्थितीत सावन मीलन कार्यक्रम संपन्न
पुणे: प्रतिनिधी
संस्कार हीच राजपूत क्षत्रिय स्त्रीची खरी ओळख असून काळानुरूप जरूर आधुनिक व्हा, मात्र, संस्कार सोडू नका, असे आवाहन दिल्ली येथील राष्ट्रवादी विचारवंत मीनाक्षी सेहरावत यांनी राजपूत महिलांना केले.
समस्त राजपूत महिला संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सावन मीलन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उदयपूरच्या महाराणी निवृत्ती कुमारी यांच्यासह घुमर नृत्यगुरु शीतल राठोर, समस्त राजपूत महिला संघाच्या पुणे अध्यक्षा मीनल यज्ञदत्तसिंह हजारे यांच्यासह महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
या कार्यक्रमात पारंपरिक पद्धतीने राजपुरोहित दिवाकर गोरे यांच्या हस्ते शस्त्रपूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे शस्त्राचा दुरुपयोग न करता ते देव, देश आणि धर्मासाठी धारण करण्याची शपथ घेण्यात आली.
शस्त्र आणि शास्त्र हे हातात हात घालून चालले पाहिजेत. आधुनिक जीवनशैलीचा अंगीकार करताना आपल्या समृद्ध संस्कृती आणि परंपरा यांचा विसर पडता कामा नये, याची जाणीव सेहरावत यांनी या कार्यक्रमात बोलताना करून दिली.
महाराणी निवृत्ती कुमारी यांनी आपल्या मनोगतातून महिलांना सक्षम होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
शीतल राठोड यांनी घुमर नृत्य नेमके कसे करावे या बद्दल महिलांना मार्गदर्शन केले, घुमर नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीनल हजारे यांनी केले.
या कार्यक्रमाला सर्व राजपूत शाखांमधील महिला राजपूती पोशाख या पारंपारिक पेहरावात उपस्थित होत्या. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या राज्यातील विविध भागातील महिलांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. समस्त राजपूत महिला संघ ही संस्था राजपूत समाजासाठी कार्यरत आहे. तसेच कार्यक्रमास संपूर्ण महाराष्ट्रातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्या बद्दल अध्यक्षांनी आभार मानले.