'आव्हाड यांची भूमिका शरद पवार, सुप्रिया सुळे यांना मान्य आहे का?'
सनातन धर्माबाबत नितेश राणे यांनी केला सवाल
मुंबई: प्रतिनिधी
सनातन धर्माने देशाचे वाटोळे केले, ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड ही भूमिका पक्षाध्यक्ष शरद पवार आणि कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांना मान्य आहे का? ते या विधानाचे समर्थन करतात का, असा सवाल मंत्री नितेश राणे यांनी केला आहे.
सनातन धर्माने देशाचे वाटोळे केले, असा आरोप करताना आव्हाड यांनी जातीयवाद व अस्पृश्यता कोणी निर्माण केली, असा सवाल केला आहे. सनातनी लोकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक नाकारला. छत्रपती संभाजी महाराज यांना बदनाम केले, असे आरोपही केले. त्यांच्या या विधानावरून राजकीय वर्तुळात वादळ उठू लागले आहे.
आव्हाड अशी विधाने कोणाला खुश करण्यासाठी करीत आहेत, असा सवाल भारतीय जनता पक्षाचे नेते राम कदम यांनी केला. हे सर्व गलिच्छ राजकारणासाठी चालले आहे, असा आरोपही त्यांनी केला. या विधानाबद्दल आव्हाड यांनी हात जोडून माफी मागावी, अशी मागणी देखील त्यांनी केली.
सनातनी लोकांना दहशतवादी ठरवण्यापूर्वी पहलगाम येथे धर्म विचारून हत्या करणाऱ्यांचा मुस्लिम दहशतवादी, असा उल्लेख करून दाखवा, असे आव्हान भाजपचे केशव उपाध्ये यांनी आव्हाड यांना दिले आहे. सनातन धर्माला बदनाम करणे अत्यंत चुकीचे आहे, अशी प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केली आहे.
यापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी 'भगवा दहशतवाद' असा उल्लेख करण्याऐवजी हिंदू अथवा सनातनी दहशतवाद, असा उल्लेख करावा अशी मागणी करून वाद निर्माण केला आहे. आव्हाड यांच्या विधानाने त्यात भर पडत आहे.