- राज्य
- गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा सर्वपक्षीय नेत्यांकडून निषेध
गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचा सर्वपक्षीय नेत्यांकडून निषेध
शरद पवार, सुप्रिया सुळे, प्रकाश आंबेडकर, सुषमा अंधारे यांनी घेतली दखल
मुंबई: प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सर्वपक्षीय नेत्यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. या हल्ल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी दूरध्वनीवर गायकवाड यांच्याकडून या हल्ल्याची माहिती घेतली तर वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
जन्मेजयराजे भोसले यांच्या सत्कारासाठी अक्कलकोट दौऱ्यावर असलेल्या गायकवाड यांच्यावर शिवधर्म फाउंडेशनचा दीपक काटे व जमावाने हल्ला करून त्यांच्या चेहऱ्याला वंगण व काळी शाई फासली. त्यांचे कपडे फाडण्याचा आणि धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
हा प्रकार घडल्यानंतर शरद पवार यांनी गायकवाड यांना दूरध्वनी करून हल्ला कधी झाला, कसा झाला, मारहाण झाली का, किती हल्लेखोर होते, घटनास्थळी पोलीस होते का याबद्दल सखोल चौकशी केली. सुप्रिया सुळे यांनी देखील गायकवाड यांची विचारपूस केली.
प्रकाश आंबेडकर यांनी समाजमाध्यमाद्वारे या हल्ल्याचा निषेध केला. अशा प्रकारच्या भ्याड हल्ल्यातून समाजात भांडणे लावण्याचा प्रयत्न होत आहे. या कृत्यांमागे कोणती डोकी आहेत ते आपल्याला माहिती आहे. या हल्ल्याचा पुन्हा एकदा तीव्र निषेध, असे आंबेडकर यांनी म्हटले आहे.
हल्लेखोर बहुजन, हल्ला झालेले बहुजन, त्रयस्थ बघताहेत मजा
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी या हल्ल्याची कठोर शब्दात निंदा केली आहे. हल्लेखोर बहुजन वर्गाचे आहेत. ज्यांच्यावर हल्ला झाला ते बहुजन वर्गातील आहेत. त्रयस्थ मजा बघत आहेत, अशी टीका करतानाच, माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ज्या वेळी राजमाता जिजाऊ यांच्याबद्दल बोलले, प्रशांत कोरटकर छत्रपती शिवारायांबद्दल बोलला त्यावेळी हे हल्लेखोर कोणत्या बिळात लपले होते, असा सवालही त्यांनी केला.
भाजपच्या चाचणीत अव्वल नंबर...
गायकवाड यांच्यावर हल्ला करणारा दीपक काटे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निकटवर्तीय आहे. भाजपचा पदाधिकारी आहे, हे सुषमा अंधारे यांनी निदर्शनास आणून दिले. या कामगिरीसाठी काटे याला आमदारकी, खासदारकी किंवा एखादे महामंडळ देऊन टाका. भाजपच्या पात्रता चाचणी परीक्षेत पोरगा अव्वल नंबरने पास झाला आहे, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.