- राज्य
- 'केवळ काळे फासण्याचा नव्हे तर जीव घेण्याचा कट'
'केवळ काळे फासण्याचा नव्हे तर जीव घेण्याचा कट'
संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रवीण गायकवाड यांचा आरोप
सोलापूर: प्रतिनिधी
विचारांना विरोध असल्यामुळे ज्याप्रमाणे डॉ नरेंद्र दाभोळकर, गोविंदराव पानसरे, गौरी लंकेश, एम एम कलबुर्गी यांची हत्या करण्यात आली त्याचप्रमाणे संभाजी ब्रिगेडची संविधानावर आधारित विचारसरणी मान्य नसल्यामुळे शिवधर्म फाउंडेशनचे दीपक काटे यांचा आपल्याला केवळ काळी फसण्याचा नव्हे तर आपला जीव घेण्याचा कट होता, असा आरोप संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रवीण गायकवाड यांनी केला आहे.
दीपक काटे हे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत. झालेल्या घटनेची नैतिक जबाबदारी गृहमंत्री आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी घेणे आवश्यक आहे, असेही गायकवाड म्हणाले.
संभाजी ब्रिगेड या संघटनेच्या नावात 'छत्रपती संभाजी' असा उल्लेख असावा, अशी काटे यांची मागणी आहे. गेल्या काही महिन्यांपासून ते त्यासाठी आग्रही आहेत. आम्हाला देखील ती मान्य आहे. मात्र, या नावाची नोंद सरकार दप्तरी यापूर्वीच झाली असल्याने त्यात बदल होऊ शकत नाही. धर्मादाय आयुक्त कार्यालयातून त्यासाठी काही तांत्रिक अडचणी आहेत. आम्ही हे काटे यांच्या निदर्शनास आणून दिले आहे. तरीदेखील काहीतरी कारण काढून वैचारिक विरोधकांना धमकावण्याचा हा प्रयत्न आहे. मात्र, आमचे कार्यकर्ते त्याला त्यांच्या पद्धतीने उत्तर दिल्याशिवाय राहणार नाहीत, असेही गायकवाड यांनी नमूद केले.
छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर असे अनेक विचारवंत आपले विचार मांडून गेले. त्यांच्यानंतरही संविधानाच्या स्वरूपात त्यांचे विचार कायम आहेत. त्यामुळे कोणताही माणूस संपवून त्याचा विचार संपवता येत नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले.
फडणवीस यांनी राजीनामा द्यावा: गोपाळ तिवारी
संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्यात भारतीय जनता पक्षाचा सहभाग स्पष्टपणे दिसून येत आहे. हल्लेखोरांच्या टोळक्याचा म्होरक्या दीपक काटे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून भाजपचा पदाधिकारी आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या हल्ल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केली आहे.