- राज्य
- 'अर्ज, विनंत्या बंद करा, ऑगस्ट महिन्यात निकाल देऊ'
'अर्ज, विनंत्या बंद करा, ऑगस्ट महिन्यात निकाल देऊ'
शिवसेना पक्ष, चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
नवी दिल्ली: प्रतिनिधी
शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत दाखल असलेल्या याचिका ऑगस्ट महिन्यात निकाली काढू. आता त्या संदर्भात अर्ज विनंती करणे बंद करा, असे सर्वोच्च न्यायालयाने वकिलांना सुनावले. केवळ पाचच मिनिटात न्यायालयाने सुनावणी संपवली.
निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला दिले आहे. त्याच्या विरोधात ठाकरे गटाने याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार होती. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या सुनावणीकडे लागले होते.
दुपारी साडेबारा वाजता याचिकेची सुनावणी सुरू होताना याचिकाकर्त्यांचे वकील ज्येष्ठ कायदे तज्ञ कपिल सिब्बल न्याय कक्षात उपस्थित नव्हते. आम्हाला खटला निकाली काढायचा आहे. तुम्ही दोघे कधी युक्तिवाद करणार ते सांगा, अशी विचारणा न्यायालयाने सिब्बल यांच्या सहाय्यक वकिलांकडे केली. एवढ्यात सिब्बल यांचे न्याय कक्षात आगमन झाले. मात्र, न्यायालयाने या याचिकेची सुनावणी ऑगस्ट महिन्यात घेऊ, असे सांगितले. तारखांची उपलब्धता पाहून लवकरच तारीख दिली जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले.