- राज्य
- ... म्हणून कार्यकर्ते भाजपमध्ये येतात: बावनकुळे
... म्हणून कार्यकर्ते भाजपमध्ये येतात: बावनकुळे
दीपक काटे याच्यावर कठोर कारवाईची मागणी
मुंबई: प्रतिनिधी
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे कार्यकर्त्यांना भेटत नाहीत. त्यांना कार्यकर्ते सांभाळता येत नाहीत. त्यामुळे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात येतात. त्यासाठी आम्ही कोणाला लालूच दाखवत नाही किंवा धमकावत नाही, असा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. तसेच संभाजी ब्रिगेडचे संस्थापक प्रवीण गायकवाड यांना काळे फासणारा दीपक काटे भाजपचा पदाधिकारी असला तरी त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून किंवा इतर कोणत्याही पक्षातून कार्यकर्त्यांनी भाजपा मध्ये यावे यासाठी भाजप कोणालाही लालूच दाखवण्याचे अथवा धनकावण्याचे प्रकार करत नाही. उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहत नाहीत. त्यांना कार्यकर्ते सांभाळता येत नाहीत. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते भाजपामध्ये येत आहेत. भाजपचे 137आमदार आहेत. ते लोकांशी संपर्क ठेवून आहेत. लोकांची कामे करीत आहेत. त्यामुळे पक्ष वाढतो आहे, असा दावाही बावनकुळे यांनी केला.
प्रवीण गायकवाड यांना काळे फासणारा दीपक काटे हा भाजपच पदाधिकारी असून बावनकुळे यांचा निकटवर्तीय आहे, असा आरोप केला जात आहे. त्याबद्दल बोलताना बावनकुळे म्हणाले की, कोणताही कार्यकर्ता मंत्री अथवा पक्षाच्या नेत्यांबरोबर छायाचित्र काढून घेत असतो. त्यावेळी प्रत्येक कार्यकर्त्याची पार्श्वभूमी नेत्याला माहिती असते किंवा तो प्रत्येक कार्यकर्ता संबंधित नेत्याचा निकटवर्तीय असतो असे नाही. दीपक काटे हा भाजपचा पदाधिकारी असेल तरीदेखील त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी देखील बावनकुळे यांनी केली.