- राज्य
- 'गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचे भाजपने द्यावे स्पष्टीकरण'
'गायकवाड यांच्यावरील हल्ल्याचे भाजपने द्यावे स्पष्टीकरण'
खासदार अमोल कोल्हे यांची मागणी
पुणे: प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे झालेल्या हल्ल्यात भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांची नावे पुढे येत असून या हल्ल्याबाबत भाजपने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी केली आहे.
जन्मेजयराजे भोसले यांच्या सत्कार समारंभासाठी अक्कलकोट येथे गेले असता गायकवाड यांच्यावर शिवधर्म फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना कारमधून बाहेर काढून त्यांच्या चेहऱ्यावर काळी शाई व वंगण फासण्यात आले. कपडे फाडण्याचा आणि धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न करण्यात आला.
या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले असून विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांनी व सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. पंढरपूर येथील संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी गायकवाड यांचा दुग्धाभिषेक करून त्यांचे स्वागत केले. अशा भ्याडघटनांचे आपले कार्यकर्ते त्यांच्या पद्धतीने प्रत्युत्तर देतील, असा इशाराही गायकवाड यांनी दिला आहे.
गायकवाड यांच्यावरील हा हल्ला निंदनीय असून त्यात भाजप कार्यकर्त्यांची नावे येत असल्यामुळे भाजपाने त्याचे स्पष्टीकरण करावे. त्याचप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी स्पष्ट भूमिका घेऊन कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी अमोल कोल्हे यांनी केली आहे.