पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ३०० व्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन
पुणे, दि.२७ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त शनिवार ३१ मे रोजी बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे दुपारी १२.३० वाजता भव्य सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला विनामूल्य प्रवेश असून सर्व नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
कार्यक्रमाचे आयोजन सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि पुण्यश्लोक फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार असणार आहेत. कार्यक्रमाला मुख्यमंत्र्याचे तथा सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा पुढीलप्रमाणे- दुपारी १२.३० ते १.०० वा. स्वागत सत्र, १.०० ते १.३० शाहिरी पोवाडा, १.३० ते २.३० उद्घाटन, मान्यवर सत्कार व मनोगत आणि संध्याकाळी २.३० ते ५.१० वाजता पुण्यश्लोक महानाट्य सादर केले जाईल. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ह्या केवळ राज्यकर्त्या नव्हत्या तर प्रजाहितदक्ष होत्या. त्यांनी अनेक घाट, मंदिरांचा जिर्णोद्धार, पानपोई, धर्मशाळा आदी अनेक कामे केली आहेत. त्यांच्या कार्याचे स्मरण म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या सोहळ्यात शाहिरी पोवाडा, भारूड, वासुदेव यांसारखे पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम लोककलाकर सादर करणार आहेत, तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर आधारित महानाट्य हे विशेष आकर्षण असणार आहे, असे सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चवरे यांनी कळविले आहे.
000