- राज्य
- 'सासरी वावरताना जरा जरी संशय आला...'
'सासरी वावरताना जरा जरी संशय आला...'
लग्न करून सासरी जाणाऱ्या मुलींना अजित दादांचा मोलाचा सल्ला
कोल्हापूर: प्रतिनिधी
वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लग्न करून सासरी जाणाऱ्या मुलींना मोलाचा सल्ला दिला आहे. सासरच्या मंडळींच्या वागण्याचा जरा जरी संशय आला तर लगेच पोलिसांकडे तक्रार करा. त्यामुळे त्वरित कारवाई करता येते आणि आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलण्याची वेळ येत नाही, असा सल्ला दादांनी दिला आहे.
महिलांची कोणत्याही प्रकारची तक्रार असल्यास त्याची त्वरेने दखल घेण्याचे आदेश पोलीस व अन्य यंत्रणांना दिले आहेत. महिलांना त्रास भोगावा लागू नये यासाठी कडक कायदे अस्तित्वात आहेत. त्यामुळे महिलांनी गरज पडल्यास त्वरित तक्रार दाखल करावी, असे अजित पवार यांनी सांगितले.
दुसऱ्या सुनेकडेही होणार चौकशी
वैष्णवी हगवणे यांनी हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे आत्महत्या केल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर हगवणे कुटुंबातील दुसऱ्या सुनेने आपलाही छळ झाल्याचा दावा केला आहे. त्यासंबंधी त्यांच्याकडेही चौकशी केली जाणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
... यामुळे प्रचंड मनस्ताप
वैष्णवी आणि शशांक हगवणे यांच्या लग्नात आपण उपस्थित होतो त्यावरून आपल्याला व आपल्या पक्षाला टीकेचे लक्ष्य केले जात आहे. एखाद्याच्या लग्नाला जाणे हा गुन्हा आहे का? वैष्णवीच्या बाबतीत जे काही घडले त्याला मी जबाबदार आहे का? मी त्या लोकांना असे कृत्य करण्यास सांगितले का, असे सवाल अजित पवार यांनी केले. अनेकदा माध्यमातून आणि समाज माध्यमातून वैष्णवी आत्महत्या प्रकरणाशी आपला संबंध जोडला जातो. त्यामुळे प्रचंड मनस्ताप होतो. वास्तविक हगवणे कुटुंबीय जिथे कुठे असतील तिथून त्यांना अटक करा. पोलीस पथकांची संख्या दुप्पट करा, असे आदेश आपण स्वतः आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते, असे पवार यांनी सांगितले. अशा प्रकारच्या घटना घडूच नाहीत यासाठी यंत्रणा काम करीत असल्याचा दावाही त्यांनी केला.
कस्पटे कुटुंबीयांची घेणार भेट
वैष्णवी आत्महत्या प्रकरणानंतर आपण त्यांचे पिता आनंद कस्पटे यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला. मात्र, सविस्तर बोलणे होऊ शकले नाही. त्यामुळे प्रत्यक्ष जाऊन कस्पटे कुटुंबीयांची भेट घेणार असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले.