'भीमनगर वासीयांची फसवणूक होऊ देऊ नका'
मंत्री चंद्रकांत पाटील यांचे एसआरए अधिकाऱ्यांना आदेश

पुणे : प्रतिनिधी
एरंडवणे येथील भीमनगर झोपडपट्टीचे एसआरए अंतर्गत पुनर्वसन योजनेत झोपडपट्टी धारकांची कोणतीही फसवणूक होऊ देऊ नका, गरज पडल्यास नागरिकांना अधिकच्या सुविधा द्याव्यात किंवा संपूर्ण स्कीम रद्द करावी असे आदेश उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांना दिले आहेत.
भीम नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत फसवणूक व भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत, मूळ जागेपासून नऊ किलोमीटर लांब सक्तीचे स्थलांतर अमान्य करत झोपडपट्टी धारकांनी या विरोधात गेल्या काही दिवसांपासून आंदोलन पुकारलेले आहे. या संदर्भात त्यांनी नुकतेच मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयावर बिऱ्हाड मोर्चा नेला होता. या बिऱ्हाड मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आज चंद्रकांत पाटील व झोपडपट्टी धारकांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत नागरिकांच्या समस्या ऐकून घेऊन कोणत्याही परिस्थितीत झोपडपट्टी धारकांची फसवणूक होणार नाही, याबाबत आपण सर्व ती काळजी घेऊ असे आश्वासन त्यांनी झोपडपट्टी धारकांना दिले. तसेच झोपडपट्टी धारकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून सदर पुनर्वसन प्रक्रियेमध्ये झोपडपट्टी धारकांना अधिक लाभ देण्यात यावा अथवा फसवणूक झाली असल्यास संपूर्ण योजना रद्द करावी असे आदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांना चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत.
मंत्री चंद्रकांत पाटील यांनी झोपडपट्टी धारकांच्या हिताचा विचार मांडल्याने आंदोलनात बळकटी प्राप्त झाली असून झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत झोपडपट्टी धारकांना फसवणूक करण्याचा इरादा ठेवणाऱ्या बिल्डरांना यामुळे चाप लागणार असल्याची भावना यावेळी रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे, स्थानिक रहिवासी देविदास ओव्हाळ ,प्रभु सूनगर, जावेद शेख दादू गायकवाड व सुनील डमरे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, या प्रश्नावर अधिक चर्चा करण्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे दालनात शुक्रवारी विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले असून या बैठकीत उपस्थित होणाऱ्या मुद्द्यांच्या आधारे पुढील निर्णय घेतला जाईल असे देखील ठरवण्यात आले आहे.
About The Author
Latest News
