म्हसवे जिल्हा परिषद गटात सबकुछ 'मानकुमरे'

म्हसवे जिल्हा परिषद गटात सबकुछ 'मानकुमरे'

स्वतः लढण्याच्या तयारीत असणाऱ्या नेत्यांची पत्नीच्या उमेदवारीसाठी मोर्चेबांधणी 

मेढा दत्तात्रय पवार : म्हसवे जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार शशिकांत शिंदे यांची हुमगाव गाव असूनही या गटावर गेली अनेक वर्षांपासून भाजपचे नेते वसंतराव मानकुमरे यांचाच राजकीय प्रभाव राहिलेला आहे. त्यामुळे या जिल्हा परिषद गटात "सबकुछ मानकुमरे"अशीच राजकीय स्थिती आहे. हा गट सर्वसाधारण महिला आरक्षित असल्यामुळे मानकुमरे यांच्या साठी जिल्हा परिषदेचे  दरवाजे बंद झाले आहेत. त्यांच्याबरोबरच या गटात इच्छुक असणाऱ्या अनेक राजकीय नेत्यांनी आता आपल्या पत्नीच्या उमेदवारीसाठी कंबर कसली आहे.

मिशांचा पीळ जास्त काळ राहिला नाही

गेली कित्येक वर्ष म्हसवे जिल्हा परिषद गटावर मानकुमरे यांचाच प्रभाव राहिला आहे.गत पंचवार्षिक निवडणुकीत आमदार शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे हे या गटातून न लढता कुडाळ गटात लढण्यास उतरले होते.तर माथाडी कामगार संघटना चालवणारे दत्ता गावडे यांनी म्हसवे गटात उमेदवारीसाठी  मिशांना पिळ मारीत मानकुमरेंच्या विरोधात शड्डू ठोकला होता.मात्र त्यांना मानकुमरे यांच्या राजकीय चक्रव्यूहापुढे शरणागती पत्करून जिल्हापरिषद ऐवजी खर्शीबारामुरे पंचायत समिती गणाची उमेदवारी लढवावी लागली होती. 

हे पण वाचा  कोरेगाव शहरातील महामार्गावर असलेल्या पुलांची कामे तात्काळ सुरू करा

फेरआरक्षण व्हावे यासाठी देव पाण्यात

या जिल्हा परिषद गटांतर्गत येणारा म्हसवे पंचायत समिती गण हा नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव असून खर्शीबारामुरे गण खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाला आहे .त्यामुळे गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक मातब्बर इच्छुकांची आरक्षणाने कोंडी झाली आहे. नव्याने आरक्षण जाहीर होईल यासाठी गेल्या टर्मपासून उमेदवारीच्या प्रतीक्षेत असलेले व विद्यमान भाजप मंडल अध्यक्ष संदीप परामणे, समाधान पोफळे यांच्यासह अनेकांनी देव पाण्यात घातलेले आहेत. मात्र आरक्षण बदल न झाल्यास वालुथ ग्रामपंचायत ताब्यात घेतलेले समाधान पोफळे हे आपल्या पत्नीला जिल्हा परिषद उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही राहतील अशी चर्चा आहे. त्याचबरोबर हातगेघर  ग्रामपंचायतीच्या सरपंच व राजू गोळे यांच्या सुविद्य पत्नी प्रमिला गोळे, माजी उपसभापती हणमंतराव पार्टे यांच्या पत्नी शारदा जाधव-पार्टे यांची देखील नावे चर्चेत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे माजी सभापती अरुणा शिर्के व त्यांचे पती अजय शिर्के हे आम्हालाच उमेदवारी मिळणार या आशेने गटातील छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना हजेरी लावताना पाहायला मिळत आहेत.

शशिकांत शिंदे यांची या गटातील राजकीय भूमिका अद्याप गुलदस्तातच दिसून येत आहे. त्यांचा पक्ष संपूर्ण जिल्ह्यात लढण्याची तयारीत राहणार असला तरी देखील त्यांच्याच म्हसवे गटात त्यांना तगडा उमेदवार शोधण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर राहणार आहे. तरीदेखील याठिकाणी उमेदवार द्यावाच लागेल त्यांना अन्यथा जिल्ह्यात चुकीचा संदेश जाऊन त्याचा फटका शरद पवार गट राष्ट्रवादीस बसेल. संपूर्ण गट हा नामदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर नितांत प्रेम करणारा आहे. त्यामुळे भाजपकडून इच्छुकांची संख्या या गटात अधिक आहे.

खर्शी बारामुरे गण सर्वसाधारण महिलेसाठी राखीव झाला असल्यामुळे जिल्हा परिषद गटाची उमेदवारी न मिळाल्यास खर्शीबारामुरे पंचायत समिती गणाची उमेदवारी पदरात पाडून घेऊन किमान पंचायत समितीत जाता येईल का या आशेने अनेक राजकीय कार्यकर्ते हे पत्नीच्या उमेदवारीसाठी कामाला लागले आहेत.प्रत्येक कार्यक्रमांना हे इच्छुक जाणिपूर्वक हजेरी लावत आहेत.
Tags:

Advertisement

Latest News

Advt