- राज्य
- तुळजाभवानी मंदिराच्या पुजारी मंडळाच्या आजी माजी अध्यक्षांमध्ये वाद
तुळजाभवानी मंदिराच्या पुजारी मंडळाच्या आजी माजी अध्यक्षांमध्ये वाद
एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आणि सुपारीबाजीचे आरोप
धाराशिव: प्रतिनिधी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी मंदिरातील पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे यांनी विद्यमान पुजारी मंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. हे पुजारी मंडळ बरखास्त करावे, अशी मागणी यांनी धर्मादाय आयुक्तांकडे केली आहे.
दुसरीकडे पुजारी मंडळाचे विद्यमान अध्यक्ष विपीन शिंदे यांनी ही आरोप फेटाळून लावतानाच गंगणे हे सुपारी घेऊन पुजारी मंडळावर आरोप करीत असल्याचा दावा केला आहे. देवस्थानातील गैरकारभाराला कोण कारणीभूत आहे, हे लवकरच सर्वांसमोर उघड करू, असेही ते म्हणाले.
तुळजापूर मंदिर विकास आराखड्याच्या मनमानी अंमलबजावणी ला विरोध केला असल्यामुळेच गंगणे यांनी सुपारी घेऊन पुजारी मंडळावर आरोप केले असल्याचा दावा शिंदे यांनी केला आहे तर विद्यमान पुजारी मंडळावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी गंगणे यांनी केली आहे.
मागील काही काळापासून तुळजापूर देवस्थान विविध कारणांसाठी चर्चेत आहे. मंदिराच्या गाभाऱ्यातील शिळाना गेलेले तडे हा देखील चर्चेचा मुख्य विषय आहे. गाभाऱ्याच्या सद्यस्थितीची केंद्रीय पुरातत्त्व विभागाने पाहणी करून त्याचा अहवाल राज्य पुरातत्त्व विभागाला सादर केला आहे. राज्य पुरातत्त्व विभागाकडून यासंबंधी काय निर्णय घेतला जातो, याची प्रतीक्षा जिल्हा प्रशासन करीत आहे.