- राज्य
- वडगाव मावळ गोळीबाराने हादरले; भांडणाच्या वादातून झाली फायरिंग
वडगाव मावळ गोळीबाराने हादरले; भांडणाच्या वादातून झाली फायरिंग
चौघा जणांविरुद्ध वडगाव मावळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
वडगाव मावळ/ प्रतिनिधी
वडगाव मावळ केशवनगर परिसरात झालेल्या वादातून एकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दि ८ सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.गोळीबाराची घटना घडल्याने परिसरात तसेच गावात प्रचंड दहशत पसरली.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वडगाव मावळ,पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
याप्रकरणी सौरभ रोहिदास वाघमारे (रा.कुरकुंडे, ता. खेड, जि.पुणे), अभिजीत राजाराम ओव्हाळ, रणजित बाळासाहेब ओव्हाळ(दोघेही रा. सांगवी, ता. मावळ) व प्रथमेश दिवे (रा.तळेगाव दाभाडे) अशी या प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. अक्षय एकनाथ मोहिते (वय २८, रा. पवारवस्ती, केशवनगर, वडगाव मावळ ) यांनी फिर्याद दिली आहे.
वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय मोहिते यांचा चुलत भाऊ हा वडगाव येथील एका शाळेत दहावीमध्ये शिकतो. त्याने अभिजित व रणजित यांच्या भावकीतील मुलीला शाळेतून तिच्या घरी सोडले. त्यावरून आरोपींनी त्याला शाळेच्या बाहेरून मोटारीमध्ये घेऊन मारहाण केली.
त्यावरुन फिर्यादी व आरोपी यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अक्षय हा त्याच्या मित्रांसह केशवनगर येथील एकवीरा चौकात बसलेले असताना चारही आरोपी तेथे दुचाकीवरुन आले. सौरभ याने शिवीगाळ करून लगेच पिस्तुल बाहेर काढून ते अक्षयच्या दिशेने झाडले. परंतु त्यामधून गोळी निघाली नाही. अक्षय व त्याचे मित्र तिथून पळून जात असतानाच आरोपीने पुन्हा एकदा गोळी झाडली. परंतु अक्षयला गोळी लागली नाही. तो जवळच असलेल्या सोसायटीत जाऊन लपून बसला. त्यानंतर सर्व आरोपीनी दुचाकीवरून पळ काढला.
या घटनेमुळे स्थानिक नागरीकामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.मात्र भररस्त्यात खुलेआम गोळीबार झाल्याने गुन्हेगारी वाढत असल्याचे दिसून येत आहे.आरोपीच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना केली आहे याप्रकरणी पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करीत आहेत
About The Author
