महिला आयोगाने घ्यायला हवी प्रत्येक तक्रारीची दखल

मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली अपेक्षा

महिला आयोगाने घ्यायला हवी प्रत्येक तक्रारीची दखल

पुणे: प्रतिनिधी

महिलांनी केलेल्या प्रत्येक तक्रारीची दखल महिला आयोग आणि पोलिसांनी देखील घेतली पाहिजे, अशी अपेक्षा महिला बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली. सासरच्या छळामुळे आत्महत्या करणाऱ्या वैष्णवी हगवणे यांना न्याय मिळालाच पाहिजे, अशी मागणी देखील त्यांनी केली. 

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणासह एकूणच वाढत्या महिला अत्याचार प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्यावर विरोधकांकडून सातत्याने टीका केली जात आहे. त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील वारंवार केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांनी देखील महिला आयोगाचे कान टोचले आहेत. 

वैष्णवी हगवणे यांना न्याय मिळालाच पाहिजे. त्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली गेली पाहिजेत. यासंबंधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस योग्य ते निर्णय घेतील, असा विश्वास मुंडे यांनी व्यक्त केला. त्याचवेळी महिलांच्या प्रत्येक तक्रारीवर महिला आयोगाने पोलिसांनी त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे, असे मतही व्यक्त केले. 

हे पण वाचा  'प्रशासनाकडून होत आहे आरोपींची पाठ राखण'

पर्यावरण संवर्धनासाठी विशेष कार्यक्रम 

पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीच्या त्रिशतकपूर्ती निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभर पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने विशेष कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातही विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेले दगडूशेठ मंडळ देखील या उपक्रमात सहभागी असून प्लास्टिक वापर रोखण्यासाठी त्यांचा पुढाकार असल्याचे पंकजा मुंडे म्हणाल्या. 

धनंजय मुंडे यांचा योग्य निर्णय 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी झालेले गंभीर आरोप, कृषी विभागातील भ्रष्टाचाराचा आरोप या पार्श्वभूमीवर माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा घेण्यात आला. त्यानंतर धनंजय मुंडे हे नुकतेच मनःशांती मिळवण्यासाठी नाशिकजवळच्या इगतपुरी येथील विपश्यना केंद्रात गेले असून आठ दिवसापासून ते तिथे असल्याचे सांगितले जात आहे. याबाबत विचारणा केली असता पंकजा मुंडे म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांनी योग्य निर्णय घेतला आहे. आता त्यांना निश्चितपणे मनःशांती प्राप्त होईल. 

About The Author

Advertisement

Latest News

Advt