'स्थानिक पातळीवरील निर्णयात आमदारांना स्वातंत्र्य'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ग्वाही
मुंबई: प्रतिनिधी
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला राज्यातील सर्वात मोठा पक्ष बनवण्याच्या दृष्टीने काम करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदारांना दिले. त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवरील कोणताही मोठा निर्णय घेताना आमदारांना स्वातंत्र्य दिले जाईल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक डोळ्यासमोर ठेवून फडणवीस यांनी मराठवाड्यातील भाजप आमदारांच्या बैठकीचे आयोजन केले होते. आपल्या मतदारसंघातील पाच प्रमुख कामे निवडून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. त्यामुळे जनतेचा संपर्क वाढेल आणि त्यांचा विश्वास प्राप्त करण्यास मदत होईल, असे फडणवीस यांनी आमदारांना सांगितले.
स्थानिक समित्यांच्या वाटपाचे सर्व अधिकार आमदारांकडे दिले जातील. त्यामुळे स्थानिक विषयावर निर्णय घेण्यासाठी आमदारांना स्वातंत्र्य लाभेल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेताना आमदारांना विश्वासात घेतले जाईल. त्यामुळे पक्षात एकसंधता आणि विश्वास वाढीला लागेल, असेही फडणवीस म्हणाले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीनंतर भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला पाहिजे. या निवडणुकांसाठी मी स्वतः सर्व शक्ती पणाला लावणार आहे.