- राज्य
- बार आणि रेस्टॉरंट्सचा बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा
बार आणि रेस्टॉरंट्सचा बंद शंभर टक्के यशस्वी झाल्याचा दावा
सरकारचा ७० ते ८० कोटीचा महसूल बुडाला
मुंबई: प्रतिनिधी
अवाजवी करवाढीच्या विरोधात बार आणि रेस्टॉरंट्स चालकांची संघटना आहारने पुकारलेला बंद १०० टक्के यशस्वी झाल्याचा दावा संघटनेने केला आहे. या एक दिवसाच्या बंदमुळे सरकारचा ७० ते ८० कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचेही त्यांचे म्हणणे आहे.
मद्याच्या मूल्यवर्धित करात ५ टक्के, परवाना शुल्कात १५ टक्के तर उत्पादन शुल्कात तब्बल ६० टक्क्यांनी वाढ केली आहे. ही करवाढ अवाजवी असून ती कायम राहिल्यास हॉस्पिटलिटी उद्योग धोक्यात येणार आहे. यापूर्वी अनेकदा याकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा वारंवार प्रयत्न करूनही सरकारने त्याकडे साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे अस्तित्वाचा प्रश्न म्हणून आम्ही १४ जुलै रोजी बंदचे पाऊल उचलल्याचे आहारचे अध्यक्ष सुधाकर शेट्टी यांनी सांगितले.
या बंद नंतर तरी सरकारने करवाढीचा पुनर्विचार करावा आणि आर्थिक संकटात सापडलेल्या हॉस्पिटॅलिटी उद्योगाला सावरण्यासाठी मदत करावी, अशी मागणीही शेट्टी यांनी केली आहे.