- राज्य
- 'सरकार विरोधी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचा छळ'
'सरकार विरोधी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचा छळ'
बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचा संजय राऊत यांचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नाशिक दौऱ्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करणाऱ्या कृष्णा डोंगरे या शेतकऱ्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करून त्याचा छळ केला गेल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केला.
सतत सरकार विरोधी आंदोलने करतो म्हणून डोंगरे यांच्यावर नाशिकचे पोलीस आणि सतत खोटी कामे करणारे मंत्री यांनी भारतीय जनता पक्ष पुरस्कृत शिक्षण संस्थेतील शिक्षिकेला हाताशी धरून बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला. पोलिसांचा ससेमिरा त्यांच्या मागे लावला. त्यांच्या डोक्यावर सतत अटकेची टांगती तलवार ठेवली. सरकार विरोधी बोलण्यापासून रोखण्यासाठीच हे सर्व करण्यात आले, असा आरोप राऊत यांनी केला.
प्रत्यक्षात ज्या दिवशी व ज्यावेळी बलात्कार झाल्याची नोंद पोलिसांच्या दप्तरी करण्यात आली त्या दिवशी डोंगरे हे घटनास्थळी नव्हते. ते कुटुंबीयांसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी वणी येथे गेले होते. वणी येथील सीसीटीव्ही फुटेजवरून हे सिद्ध झाले आहे, असा दावाही राऊत यांनी केला.
जन सुरक्षा कायदा, शहरी नक्षलवाद याच्या वल्गना करणारे सरकार असे खोटे गुन्हे दाखल करणाऱ्या मंत्री आणि भाजप कार्यकर्त्यांवर कोणत्या कायद्याखाली गुन्हे दाखल करणार, असा सवालही राऊत यांनी केला.