- राज्य
- प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक निंदनीय: हेमंत पाटील
प्रवीण गायकवाड यांच्यावरील शाईफेक निंदनीय: हेमंत पाटील
आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करण्याची मागणी.
पुणे: प्रतिनिधी
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे शाईफेक झाल्याची घटना अत्यंत निंदनीय तसेच लोकशाहीच्या मूल्यांवर थेट आघात करणारी आहे.या घटनेनंतर सर्वसामान्यांप्रमाणे वैचारिक लढा देणाऱ्यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र धोक्यात आले आहे का, असा सवाल इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष, ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी उपस्थित केला. गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करावी, अशी मागणी देखील पाटील यांनी केली.
दिवसाढवळ्या एका संघटनेच्या प्रदेशाध्यक्षावर हल्ला होत असेल तर पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवरच प्रश्नचिन्ह उभे राहते. शिवधर्म प्रतिष्ठानचा पदाधिकारी दीपक काटेला यापूर्वी पुणे विमानतळावर जिवंत काडतुसे आणि मॅगझीनसह अटक झाली होती. त्याच्यावर एवढा गंभीर गुन्हा दाखल असून सुद्धा तो मोकाट कसा सुटला, असा सवाल उपस्थित करीत पोलिस प्रशासन राजकीय दबावाखाली काम करत आहे, असा आरोप पाटील यांनी केला.
अशा घटनांवर वेळीच वेसण घातले नाही तर राज्यात दहशतीचे वातावरण निर्माण होईल. अभिव्यक्ती स्वातंत्र्य दडपण्याचे प्रकार घटनादत्त अधिकारांचा अपमान आहेत. सरकारने आणि पोलीस प्रशासनाने या प्रकरणी कठोर भूमिका घेणे गरजेचे आहे. राज्यातील सामाजिक सलोखा आणि लोकशाही टिकवण्यासाठी सरकारने अशा असामाजिक तत्त्वांवर तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली. नागरिकांनीही शांतता आणि संविधानाच्या चौकटीत राहून आपली भूमिका मांडावी, असे आवाहन पाटील यांनी केले.