- राज्य
- राही सरनौबत तब्बल आठ वर्ष पगाराविना
राही सरनौबत तब्बल आठ वर्ष पगाराविना
उपमुख्यमंत्री अजित पवार घालणार लक्ष
मुंबई: प्रतिनिधी
आंतरराष्ट्रीय ख्यातीची नेमबाज राही सरनौबत शासकीय सेवेत असून देखील तिला तब्बल आठ वर्ष पगाराविना काढावी लागली आहेत. सातत्याने पाठपुरावा करून देखील कुठेही दाद न मिळाल्याने राही आणि कुटुंबीय यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याकडे गाऱ्हाणे मांडले. पवार यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले आहे.
राही सरनौबत ही आंतरराष्ट्रीय स्तरावरील नेमबाज आहे. तिने देशासाठी अनेक पदके जिंकली आहेत. तिच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीमुळेच तिची सन २०१४ मध्ये उपजिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली. नियुक्तीनंतर सलग तीन वर्ष तिला नियमितपणे वेतन मिळाले. मात्र, त्यानंतर सलग आठ वर्ष तिचे वेतन रोखण्यात आले आहे.
राहीने तीन वर्ष प्रशिक्षणाचा कालावधी पूर्ण न केल्यामुळे तिचे वेतन रोखण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, राही आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू असून त्यामुळेच तिला प्रशासकीय सेवेत नियुक्ती देण्यात आली आहे. विविध स्पर्धा आणि नेमबाजीच्या प्रशिक्षणामुळे तिला प्रशासकीय प्रशिक्षणासाठी सलग तीन वर्षाचा कालावधी देता आला नाही, ही बाब अधिकारी लक्षात घेत नाहीत. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याप्रकरणी लक्ष घालण्याचे ठरविले असल्याने राहीला न्याय मिळेल, अशी आशा निर्माण झाली आहे.