- राज्य
- ... म्हणून नजीब मुल्ला यांना घातले जाते पाठीशी
... म्हणून नजीब मुल्ला यांना घातले जाते पाठीशी
अंजली दमानिया यांचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राबोडी प्रभाग अध्यक्ष जमील शेख यांच्या हत्येची सुपारी देणारे नजीब मुल्ला हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळचे असल्यामुळे त्यांना पाठीशी घातले जात असल्याचा आरोप समाजसेविका अंजली दमानिया यांनी केला.
जमील शेख यांची २३ नोव्हेंबर २०२० मध्ये गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. ही सुपारी घेणारा आरोपी अद्याप फरार आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली. शेख यांच्या कुटुंबीयांसह पत्रकार परिषद घेऊन दमानिया यांनी त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे.
यावेळी बोलताना दमानिया म्हणाल्या की, सध्या महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर आहे. एखाद्याला गोळ्या घालून ठार केले तरी चालते. त्याचा चांगला तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांची बदली केली जाते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांच्या जवळच्या लोकांवर कोणतीही कारवाई केली जात नाही, असा आरोपही त्यांनी केला.
नजीब मुल्ला यांचा ठाण्यात अल तय्यब नावाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यासाठी त्यांनी स्थानिकांना विस्थापित केले आहे. शेख हे या विस्थापितांसाठी लढत होते. त्यामुळे त्यांची हत्या करण्यात आली. त्या आधीही सन २०१४ मध्ये डोळ्यात मिरची पूड टाकून हल्ला करण्यात आला होता.
मुख्यमंत्र्यांकडून कारवाईबाबत साशंकता
आपण या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मेसेज केला आहे. मात्र, त्याला कोणतेही उत्तर देण्यात आले नाही. इतर मेसेजेसना उत्तरे येतात. मात्र, एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मुख्यमंत्र्यांचे डावे, उजवे हात आहेत. त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्री काही कारवाई करतील की नाही याबाबत शंका आहे, असेही दमानिया म्हणाल्या.