"शरद पवार हेच कुटुंबप्रमुख; मार्गदर्शन कायम लाभणार"
अजित पवार यांनी दिला कार्यकर्त्यांना दिलासा
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा दिला असला तरीही राष्ट्रवादी काँग्रेस हे एक कुटुंब आहे. शरद पवार हेच या कुटुंबाचे कुटुंबप्रमुख असणार आहेत. त्यांचे मार्गदर्शन आपल्याला दीर्घकाळ लाभणार आहे, अशा शब्दात पक्षाचे द्वितीय क्रमांकाचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.
मुंबई: प्रतिनिधी

शरद पवार हे एक मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राजीनामा देणार होते. मात्र महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेमुळे त्यांनी आपला निर्णय एक दिवस उशिरा जाहीर केला, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
पवार यांच्या राजीनामामुळे भावना विवो शिवण्याचे कारण नाही. कुटुंब प्रमुख म्हणून पवार यांचे मार्गदर्शन आपल्याला लाभणारच आहे, असे अजित पवार यांनी स्पष्ट केले. नव्या अध्यक्षांना पक्षातील सर्व नेत्या कार्यकर्त्यांचा एकदिलाने पाठिंबा असेल, असेही पवारांनी नमूद केले.
पवार यांच्या राजीनाम्यानंतर दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, जितेंद्र आव्हाड अशा पक्षाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांनी या निर्णयाला विरोध व्यक्त केला. आपला हा निर्णय आम्हाला मान्य नाही. आपण या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी विनंती या नेत्यांनी पवार यांना केली. मात्र, पवार आपल्या निर्णयावर ठाम राहिले. पवार यांच्या या निर्णयानंतर जयंत पाटील यांना भावनावेगाने अश्रू आवरणे कठीण झाले.
आघाडीवर परिणाम होणार नाही: नाना पटोले
शरद पवार हे महाविकास आघाडीचे शिल्पकार आहेत. एवढ्या अचानकपणे पवार यांचा राजीनामा अनपेक्षित होता. अखेरच्या श्वासापर्यंत पवार हे सार्वजनिक जीवनात सक्रिय राहतील अशी अपेक्षा होती. मात्र, पवार यांच्या या अनपेक्षित राजीनाम्याने महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही. नवे अध्यक्ष आघाडी बरोबर असतील अशी खात्री आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केली
Comment List