'महाविकास आघाडी मिळवणार 180 पेक्षा अधिक जागा'
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा दावा
अहमदनगर: प्रतिनिधी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपासाठी महाविकास आघाडीच्या तीन बैठका पार पडल्या असून आत्तापर्यंत 125 जागांवर एकमत झाले आहे, असे सांगतानाच, या निवडणुकीत महाविकास आघाडी 180 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवेल, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
आघाडीसमोर महायुतीचे आव्हान नाही
या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीसमोर महायुतीचे आव्हान असल्याचे जाणवत नाही. राज्यातील जनतेच्या मनात महायुतीबद्दल असंतोष आहे. लोकसभा निवडणुकीत हे स्पष्टपणे दिसून आले आहे, असा दावाही थोरात यांनी केला. महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात तुलना करता येणार नाही. जागावाटपावरून महायुतीत मारामाऱ्या सुरू आहेत तर महाविकास आघाडीत सलोख्याने चर्चा सुरू आहेत, असेही ते म्हणाले.
न्यायाधीशांवरही दबाव असल्याच्या चर्चा सुरू
भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या निवासस्थानी भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गणेशाचे दर्शन घेतले. त्यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट सरन्यायाधीशांच्या भूमिकेबद्दलच शंका व्यक्त केली आहे. त्याबाबत प्रतिक्रिया देताना थोरात म्हणाले की, सध्याच्या वातावरणात न्यायाधीशांवरही सरकारचा दबाव असल्याच्या चर्चा सुरू आहेत.
उद्धव ठाकरे यांची हिंदुत्वाबाबत भूमिका स्पष्ट
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची हिंदुत्वबाबतची भूमिका स्पष्ट आहे. ते धर्मात भेदाभेद करत नाहीत. त्यांचा विरोध केवळ देशविरोधी मुस्लिमांना आहे, असा दावा थोरात यांनी केला. एमआयएमला महाविकास आघाडीत समाविष्ट करून घेण्याबाबत आपल्याला कोणतीही कल्पना नाही. याबाबतच्या चर्चा वरिष्ठ पातळीवर झाल्या असण्याची शक्यता आहे, असेही थोरात म्हणाले. मुस्लिमांना त्यांच्या हक्काचे प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे, अशी आपली भूमिका असून काँग्रेसकडून सक्षम मुस्लिम उमेदवारांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही त्यांनी नमूद केले.
अजित पवार यांची भूमिका जनतेला अमान्य
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात बंडाचा झेंडा उभारून भारतीय जनता पक्षाच्या वळचणीला जाऊन बसण्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका महाराष्ट्रातीलच नव्हे तर खुद्द बारामतीतील नागरिकांनीही अमान्य केली आहे, असेही थोरात म्हणाले.