'कविकट्टामध्ये सहभागासाठी शुल्क आकारू नका'
साहित्य संमेलनाच्या आयोजकांना शरद पवार यांची सूचना
नवी दिल्ली: प्रतिनिधी
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या कवी कट्टा उपक्रमात सहभागी कवींना कोणत्याही प्रकारे शुल्क आकारले जाऊ नये, अशी सूचना स्वागताध्यक्ष शरद पवार यांनी आयोजकांना केली आहे.
९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथे २१,२२,२३ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न होत आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद शरद पवार यांनी स्वीकारले आहे. संजय नहार यांच्या सरहद, पुणे या संस्थेने आयोजनाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे.
कविकट्टा उपक्रमामध्ये कविता सादरीकरण करणाऱ्या कवींनी भोजन,नाश्ता, निवास, यासाठी साडेतीन हजार रुपये द्यावे, अशा आशयाची पत्रे नवोदित कवींना पाठवली. अनेकांनी या संदर्भात विख्यात साहित्यिक, वक्ते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते शरद गोरे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली.
गोरे यांनी ही बाब साहित्य व साहित्यिकांवर प्रेम असणाऱ्या शरद पवार यांच्या कानावर घातली. त्यांनी आयोजक संजय नहार यांच्याशी पुणे कार्यालयात सविस्तर चर्चा केली. त्यांनी कविकट्टा उपक्रमात सहभागी होणाऱ्या कवींकडून कुठलेही शुल्क घेणार नाही, अशी माहिती दिली.
Comment List