'साप साप म्हणून भुई थोपटू नका'
छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती
मुंबई: प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागणे गैर आहे. साप साप म्हणून भुई धोपटू नका. मी स्वतः देखील या अवस्थेतून गेलो आहे. कोणाचातरी बळी देऊन मिळणारे मंत्री पद मला नको आहे, अशी स्पष्टोक्ती राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ यांनी केली.
देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या मुळाशी मुंडे यांचा निकटवर्तीय वाल्मिक कराड असल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी किमान तपास पूर्ण होईपर्यंत मुंडे यांचा राजीनामा घेऊन त्यांना मंत्रीपदापासून दूर ठेवावे, केवळ विरोधकच नव्हे तर मुंडे यांचे स्वपक्षीय आमदारही करीत आहेत. मुंडे यांचा राजीनामा घेऊन आपल्याला मंत्रिपद दिले जाणार का, यावर बोलताना भुजबळ यांनी ते स्पष्टपणे नाकारले.
देशमुख हत्याप्रकरणी काटेकोर चौकशी केली जाईल, अशी ग्वाही खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. चौकशीअंती दोषी आढळणाऱ्या आका,बाका,काका कोणालाही सोडणार नाही, असेही त्यांनी सांगितले आहे. अद्याप चौकशी पूर्ण झालेली नाही. धनंजय मुंडे यांच्या विरोधात कोणताही पुरावा मिळालेला नाही. अशा वेळी त्यांच्या राजीनामाची मागणी करणे अयोग्य आहे, असे मत भुजबळ यांनी व्यक्त केले.
मी स्वतः या परिस्थितीतून गेलो आहे. बनावट मुद्रांक प्रकरणी मी कारवाई केली. अब्दुल करीम तेलगी याला गजाआड केले. त्यावेळी मी गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री होतो. राज्य आमचे होते. तरीही माझ्यावर आरोप झाल्यानंतर माझ्याकडून राजीनामा घेण्यात आला. अखेर मी सर्वोच्च न्यायालयात गेलो. केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार होते. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) चौकशी करून माझा दोष नसल्याचे स्पष्ट केले. मला मनस्ताप झाला. त्यामुळे आरोप सिद्ध झालेला नसताना राजीनामा मागणे योग्य नाही, असे आपले मत असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या कार्यक्रमात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर प्रवास केला त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्याबरोबर चर्चा देखील झाली. मात्र, या दोघांशी झालेल्या चर्चेत राजकीय चर्चेचा समावेश नव्हता, असे स्पष्टीकरण भुजबळ यांनी दिले.