'पैसे देऊन नोकरी मिळवणारे अभियंते पुढे...'
मुंबई महापालिका परीक्षेत भ्रष्टाचार झाल्याचा मनसेचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी
महापालिकेत अभियंता पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर फुटला असून त्यात कोट्यावधीचा भ्रष्टाचार झाला आहे. अशा रीतीने पैसे देऊन नोकरी मिळवणारे अभियंते रुजू झाल्यानंतर पैसे खाण्याचेच काम करतील, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी दिला आहे.
महापालिकेच्या गट-अ मध्ये अभियंता पदासाठी दिनांक 25 फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्यात आली. सुमारे बाराशे उमेदवारांनी ही परीक्षा दिली. मात्र, या परीक्षेत गैरप्रकार झाला असून दिनांक 19 रोजी प्रश्नपत्रिका फुटली आणि एकेका प्रश्नासाठी दहा दहा लाख रुपये घेण्यात आले. अशाप्रकारे आपण घोटाळेबाज अभियंत्यांना रुजू करून घेणार आहोत का, असा सवाल देशपांडे यांनी महापालिका प्रशासनाला केला आहे.
ज्या उमेदवारांनी प्रामाणिकपणे परीक्षा दिली, अशा उमेदवारांवर अन्याय होण्याची भीती लक्षात घेऊन त्यांच्या मोठ्या गटाने मनसेकडे धाव घेतली आहे. त्यानुसार मनसे प्रमुख राज ठाकरे यांना आपण या सगळ्या प्रकरणाची कल्पना दिली आहे. ते लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कारवाईची मागणी करणार आहेत. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडून प्रतिसाद न मिळाल्यास मनसे आपल्या पद्धतीने या प्रश्नावर मार्ग काढेल, असा इशाराही देशपांडे यांनी दिला आहे.
Comment List