ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचे हृदयविकाराने निधन
हिंदी चित्रपट सृष्टी शोकाकूल
मुंबई: प्रतिनिधी
ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार उर्फ भारत कुमार यांचे रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. त्यांना हृदय आणि संबंधित विकारांसाठी कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज पहाटे साडेतीन वाजता त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाबद्दल भारतीय चित्रपट सृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
मनोज कुमार यांचा जन्म सध्या पाकिस्तानात असलेल्या अबोटाबाद येथे सन 1937 मध्ये झाला. त्यांचे मूळ नाव हरीकृष्णन गोस्वामी असे होते. चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्यांनी मनोज कुमार हे नाव धारण केले. त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक देशभक्तीपर चित्रपटात प्रमुख भूमिका केल्याने त्यांना भारत कुमार या नावाने ओळखले जाऊ लागले.
फॅशन या चित्रपटाद्वारे मनोज कुमार यांनी सन 1957 मध्ये चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यानंतर त्यांना कांच की गुडिया या चित्रपटात अभिनय करण्याची संधी मिळाली. आपल्या कारकिर्दीत मनोज कुमार यांनी उपकार, पूरब और पश्चिम, रोटी कपडा और मकान, क्रांती अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका निभावली.
भारतीय चित्रपटसृष्टीतील उल्लेखनीय कार्यासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार, दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मश्रीसह अनेक मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.