बाहेर भारताकडून, तर आत बलोच आर्मीकडून पाकिस्तानला तडाखे
बलुचिस्तानमधील दोन जिल्ह्यातून हाकलले पाकिस्तानी लष्कर
नवी दिल्ली: वृत्तसंस्था
पाकिस्तान एकीकडे भारताकडून सडकला जात असताना आतून बलोच लिबरेशन आर्मी पाकिस्तानला जोरदार तडाखे दत आहे. बलुचिस्तानातील दोन जिल्ह्यांवर बलोच आर्मीने ताबा मिळवला असून या जिल्ह्यातून पाकिस्तानी लष्कर आणि पंजाबी नोकरशहांना हाकलून देण्यात आले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात सध्या जोरदार संघर्ष सुरू आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर हाती घेतले आहे. त्याचा प्रतिकार करण्याचे पाकिस्तानचे प्रयत्न मात्र केविलवाणे ठरत आहेत. भारताने पाकिस्तानात घुसून अनेक दहशतवादी तळांसह लष्करी तळ, विमानतळ, बंदरे नेस्तनाबूत केली आहेत. पाकिस्तानकडून भारतावर करण्यात आलेले सर्व हल्ले फोल ठरले आहेत. भारतावर आलेले प्रत्येक क्षेपणास्त्र, ड्रोन आणि लढाऊ विमान भारताने जमीनदोस्त केले आहे. स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणाऱ्या बलोच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या नाकात दम आणला आहे.
स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणाऱ्या आंदोलकांचा आवाज दडपण्यासाठी पाक सैन्याने तब्बल दीडशे बलोच आंदोलकांना अटक केली. तरीही स्वतंत्र बलुचिस्तानचा आवाज रोखला गेला नाही. उलट बलोज लिबरेशन आर्मीने केच, बंजगुर आणि लासबेला या जिल्ह्यांच्या मुख्यालयांची नाकाबंदी केली. त्या ठिकाणी तैनात असलेल्या पाकिस्तानी सैन्याची हकालपट्टी केली. जिल्हा मुख्यालयाच्या इमारतींना आगी लावण्यात आल्या. यावेळी जिल्हा कार्यालयात असलेले नोकरशहा आणि सरकारी बाबू यांनी धूम ठोकली. या जिल्ह्यांचा भूभाग हा स्वतंत्र बलुचिस्तानचा भाग असल्याचे बलोच आर्मीने जाहीर केले आहे.
स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणाऱ्या बलोच सरकारने आपल्याला स्वतंत्र राष्ट्र म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी संयुक्त राष्ट्र संघाकडे केली आहे. तसेच भारतात बलुचिस्तानचा दूतावास सुरू करण्यास मान्यता देण्याची विनंती भारताकडेही केली आहे.