6G तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताची दमदार पावले
111 पेक्षा अधिक संशोधन प्रकल्प आणि 300 कोटी रुपयांचा निधी
नवी दिल्ली: प्रतिनिधी
5G पेक्षा 100 पट अधिक गतीने इंटरनेट सेवा उपलब्ध करून देण्यासाठी भारताने 6G इंटरनेटच्या 111 पेक्षा अधिक संशोधन प्रकल्पांना मंजुरी दिली असून त्यासाठी तब्बल 300 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे, अशी माहिती केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री चंद्रशेखर पेम्मासानी यांनी दिली आहे. 6G तंत्रज्ञानात पेटंट दाखल करणाऱ्या जगातील आघाडीच्या सहा देशांमध्ये भारताचा समावेश झाला आहे.
6G तंत्रज्ञान हे टेराहर्ट्झ फ्रिक्वेन्सीवर काम करणारे आहे. त्यामुळे इंटरनेटच्या सुविधांमध्ये 5G पेक्षा 100 पटीने अधिक वाढ होणार आहे. अर्थातच इंटरनेटचा वेग आणि कनेक्टिव्हिटी यात क्रांतिकारी बदल होणार आहेत, अशी माहिती देखील पेम्मासानी यांनी दिली आहे.
भारतात प्रज्ञावान अभियंत्यांची कमतरता नाही. भारतीय अभियंता आणि वैज्ञानिक यांच्या नाविन्यपूर्ण शोधांच्या आणि तंत्रज्ञानाच्या आधारे भारत 6G तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात जगात आघाडी घेऊ शकतो, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
उत्तरप्रदेशात सेमी कंडक्टर उत्पादन प्रकल्पाला मंजुरी
दुसरीकडे केंद्र सरकारने उत्तरप्रदेशात सेमी कण्डक्टर उत्पादन करणाऱ्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. एचसीएल आणि फॉक्सकॉन या कंपन्या भागीदारीत हा प्रकल्प उभारणार आहेत. या प्रकल्पासाठी तब्बल 3706 कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. मोबाईल फोन, लॅपटॉप आणि कार मध्ये वापरल्या जाणाऱ्या चिप्सचे उत्पादन या प्रकल्पात केले जाणार आहे.
अशा प्रकल्पांमुळे भारत तंत्रज्ञानाच्या बाबतीत स्वयंपूर्णता प्राप्त करणार असून जगभरात टेक्नॉलॉजी हबचे स्थान प्राप्त करू शकणार आहे, असा दावा माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला आहे.