- राज्य
- अजितदादा पुणे महापालिका लढणार स्वबळावर?
अजितदादा पुणे महापालिका लढणार स्वबळावर?
सर्वच प्रभागांमध्ये तयारी करण्याचे माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना आदेश
पुणे: प्रतिनिधी
प्रभागरचनेवरून शहरातील भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात धुसफूस सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापालिकेच्या सर्वच प्रभागांमध्ये लढण्याची तयारी करा, असे आदेश माजी नगरसेवक आणि पदाधिकारी यांच्या बैठकीत दिले आहेत. त्यामुळे अजित पवार या निवडणुकीत महायुतीला धक्का देऊन स्वबळाचा नारा देणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
मुंबई महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा फारसा प्रभाव नाही. मात्र, पुणे शहरात, विशेषतः उपनगरांमध्ये अजित पवार यांना मानणारा वर्ग मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे या महापालिकेत वर्चस्व मिळवण्यासाठी अजित पवार यांनी कंबर कसली आहे.
निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी अजित पवार यांनी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली. या बैठकीत प्रभाग रचनेबाबत उपस्थिततांनी नाराजी व्यक्त केली. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाला सोयीची प्रभाग रचना करण्यात आल्याची तक्रार माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्याकडे केली.
मात्र, आपण याबद्दल कोणतीही न्यायालयीन लढाई लढणार नाही, असे स्पष्ट करत अजित पवार यांनी आहे त्या प्रभाग रचनेत निवडणूक लढविण्याची तयारी करण्याचे आदेश पदाधिकाऱ्यांना दिले. मात्र, त्याचवेळी महापालिकेच्या सर्वच प्रभागात निवडणूक लढविण्याची तयारी ठेवा, अशी सूचना ही त्यांनी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांना केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट ही निवडणूक स्वबळावर लढवणार का, याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.