- राज्य
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतले लालबागच्या राजाचे दर्शन
राज्यातील महत्त्वाच्या नेत्यांची विविध विषयांवर करणार विचार विनिमय
मुंबई: प्रतिनिधी
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुंबई दौऱ्यावर असून सकाळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. त्यानंतर आपल्या छोट्या नातवासह त्यांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्याबरोबर उपस्थित होते.
लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यापूर्वी शहा यांनी भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस विनोद तावडे यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मराठा आरक्षणाच्या आंदोलनाबाबत तावडे यांच्याकडून सविस्तर माहिती घेतली. त्याचप्रमाणे उपराष्ट्रपती पदाची निवडणूक आणि बिहार मधील विधानसभा निवडणूक याबाबतही त्या दोघांमध्ये चर्चा झाली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शहा यांची भेट घेऊन त्यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली. यावेळी देखील मराठा आरक्षण आंदोलनावर चर्चा झाली. त्याशिवाय मुंबई आणि अन्य महापालिका निवडणुकांच्या रणनीतीबाबत देखील या दोघांमध्ये चर्चा झाली.
लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतरही राजकीय चर्चांचे सत्र सुरूच राहणार आहे. शहा हे पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी आणि महत्त्वाचे नेते यांच्याशी भेट घेऊन राज्यातील व राष्ट्रीय पातळीवरील विविध मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत.