वळणाचे बळी! ..

मुंबई उपनगरीय रेल्वेचे अपघात नवीन नाहीत. हजारो प्रवाशांचा बळी जाऊनही रेल्वे प्रशासनाला शहाणपण सुचत नाही. पूर्वीचेच प्रयोग पुन्हा पुन्हा केले जात आहेत. अपघातासाठी दिली जात असलेली कारणे जशी काही नव्यानेच निर्माण झाली आहेत. अपघात झाल्याशिवाय उपाययोजना करायच्याच नाहीत, ही मानसिकता आणि प्रवाशांच्या मृत्यूशी आपला काहीही संबंध नाही, अशी असंवेदनशील वृत्ती प्रवाशांच्या जखमांवर मीठ चोळणारी आहे.

वळणाचे बळी! ..

भागा वरखडे 

मुंबई उपनगरीय लोकलमधून पडून किती मृत्यू झाले, यापेक्षा ते कसे झाले, का झाले, रेल्वेची त्यात किती चूक, प्रवाशांची किती चूक, की या अपघाताला ही परप्रांतीय जबाबदार याची चर्चा सुरू आहे. मुंबईत उपनगरीय रेल्वेसेवेतून प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोफ्लच्या घरात आहे. मुंबईत प्रवाशांची संख्या वाढत असताना मुंबईतील ट्रॅक आणि उपनगरीय गाड्यांची संख्या वाढवण्यासाठी जेवढे प्रयत्न व्हायला हवे होते, तेवढे झालेले नाहीत. लांब पल्ल्याच्या गाड्यांना प्राधान्यक्रम देताना ज्यांना दररोजच्या रोजी रोटीसाठी दरवाजात लोफ्लबकळत प्रवास करावा लागतो, त्याच्या उपनगरीय गाड्यांना प्राधान्यक्रम दिला जात नाही. लोकल वाहतूक अधिक गतिमान करणे, तिची वारंवारिता वाढवणे याकडे द्यायला पाहिजे तेवढे लक्ष दिले गेले नाही. प्रवाशांच्या सुरक्षिततेला जेवढे प्राधान्य द्यायला हवे, तेवढे ते दिले जात नाही. प्रवाशांची घुसमट रेल्वे स्थानकावर प्रवेश करण्यापासून होते. रेल्वे स्टेशन भोवतीची अतिक्रमणे, रिक्षा, टॅक्सी चालकांची बेशिस्त, फेरीवाल्यांचा उपद्रव सहन करून स्टेशनवर प्रवेश केला, तर लोकल उशिराने धावत असल्याची उद्घोषणा होते. उपनगरीय रेल्वे प्रवासात मरणाऱ्यांची मुंबईतील संख्या ही दुर्दैवाने जगात सर्वाधिक आहे. याचा अर्थच मुंबईच्या उपनगरीय सुरक्षा व्यवस्था किती ढिसाळ आहे, हे लक्षात येते. मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवासादरम्यान विविध कारणांनी होणाऱ्या मृत्यूचा दर हा ३८.०८ टक्के असून तो न्यूयॉर्क (९.०८ टक्के), फ्रान्स (१.४५ टक्के) आणि लंडनच्या (१.४३ टक्के) तुलनेत कैकपटीने जास्त असल्याचे उच्च न्यायालयात दाखल एका जनहित याचिकेच्या माध्यमातून पुढे आले होते. विशेष म्हणजे, मध्य आणि पश्चिम रेल्वेनेही या जनहित याचिकेवर उत्तर दाखल करताना २० वर्षांत उपनगरीय प्रवासादरम्यान ५१,८०२ हजारांहून अधिक प्रवाशांचा विविध कारणांनी मृत्यू झाल्याची कबुली दिली होती. पश्चिम रेल्वेवर २००५ पासून जुलै २०२४ पर्यंत २२,४८१ जणांना आपला जीव गमावला, तर २६,५७२ प्रवासी जखमी झाल्याची कबुली पश्चिम रेल्वेने दिली होती. दुसरीकडे, मध्य रेल्वेवर २००९ पासून जून २०२४ पर्यंत २९,२३१ प्रवाशांचा विविध कारणांनी मृत्यू झाला. यात रूळ ओलांडताना सर्वाधिक मृत्य झाले. याशिवाय, गर्दीच्या वेळी लोकलमधून पडल्यामुळे व प्रवासादरम्याान खांबाला आपटून खाली पडल्याने मृत्यू झालेल्यांचा प्रमाण जास्त असल्याचेही दोन्ही रेल्वेंनी मान्य केले होते. मध्य रेल्वेच्या लोकलकडे अगोदरच सावत्र भावाने पाहिले जाते. तिच्या समस्यांकडे कायम दुर्लक्ष होते. पश्चिम उपनगरीय रेल्वेला जादा ट्रॅक, जादा रेक, तिथे प्रत्येक चार मिनिटांना गाडी आणि मध्य रेल्वेला कित्येक मिनिटे गाडीच नाही. रेकही नाही, अशी सावत्रपणाची वागणूक दिली जाते.

दिवा-मुंब्रा स्थानकांदरम्यान सोमवारी घडलेल्या दुर्घटनेमुळे उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. मुंबईतील उपनगरीय लोकल आणि त्यातील गर्दी, त्यामुळे होणारे मृत्यू, अपघातानंतर वेळीच उपचार न मिळणे या मुद्यांबाबत उच्च न्यायालयात वेळोवेळी जनहित याचिका करण्यात आल्या व या मुद्याकडे न्यायालयाचे लक्ष वेधले गेले. न्यायालयानेही याची दखल घेऊन वेळोवेळी राज्य सरकार आणि रेल्वे प्रशासनावर ताशेरे ओढले असले, तरी प्रशासनाला कुंभकर्णी झोप लागली असल्याने प्रवाशी वाऱ्यावर आहेत. उपनगरीय रेल्वेतील प्रवाशांच्या मृत्यूसंदर्भात पालघर येथील यतीन जाधव यांनी गेल्या वर्षी जनहित याचिका दाखल केली होती. त्यातील मुद्दे लक्षात घेऊन न्यायालयाने या याचिकेची आणि त्यात नमूद केलेल्या आकडेवारीची दखल घेऊन ही लज्जास्पद बाब असल्याचे ताशेरे ओढले होते. उपनगरीय लोकलमधून नागरिकांना गुरांसारखा प्रवास करण्यास भाग पाडले जात आहे. एसी लोकल, वाढत्या प्रवासीसंख्येचा अभिमान बाळगू नका. सर्वसामान्य ज्या पद्धतीने प्रवास करतात, हे लाजिरवाणे आहे. दरदिवशी होणारे मृत्यू कसे कमी होतील त्याकडे गांभीर्याने लक्ष द्या, असे न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला बजावले होते. न्यायालयाच्या ताशेऱ्यानंतरही रेल्वे प्रशासनात काहीही बदल झालेला नाही. मध्य रेल्वेवरील सर्वच स्थानके प्रचंड गर्दीमय झाली असून, लोकलमधील गर्दीच्या नियोजनावर अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे दररोज एक ते दोन प्रवाशांचा लोकलमधून पडून मृत्यू होतो. तसेच गेल्या अनेक कालावधीपासून डोंबिवली ते ठाणे दरम्यान लोकलमधून पडून प्रवाशांचा मृत्यू होण्याच्या घटना वाढल्या आहेत. सोमवारी मुंब्रा येथील घडलेल्या घटनेनंतर रेल्वे मंडळाने सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा निर्णय घेतला आहे. उपनगरीय लोकलमध्ये दररोज लाखोंच्या संख्येने प्रवासी प्रवास करतात. अनेक प्रवासी जीव धोक्यात घालून दरवाजात उभे राहतात. यामध्ये काही प्रवाशांना धावत्या लोकलमधून पडून किंवा रेल्वेचा खांब लागून मृत्यू होतो. अशा घटना दररोज होत असतानादेखील ठोस उपाययोजना करण्यात आल्या नाहीत; परंतु मुंब्रा येथील दुर्घटनेनंतर रेल्वे मंडळाने वातानुकूलित लोकलप्रमाणे सामान्य लोकलला स्वयंचलित दरवाजा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. डिसेंबर २०१९ मध्ये पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलप्रमाणे विनावातानुकूलित लोकलला स्वयंचलित दरवाजे बसविण्याचा प्रयत्न केला जात होता; मात्र हा प्रकल्प प्रत्यक्षात प्रवाशांसाठी उपयोगात येईल, यात शंका होती. त्यामुळे लोकलचे दरवाजे स्वयंचलित करण्याचा पश्चिम रेल्वे प्रशासनाचा प्रयत्न फक्त ‌‘प्रयत्न‌’च राहिला होता. त्या वेळी मुंबई सेंट्रल कारशेडमध्ये सिमन्स प्रकारातील लोकलच्या तीन डब्यांना स्वयंचलित दरवाजे बसविण्यात आले होते; परंतु लोकलमध्ये दरवाजा बंद केल्यामुळे प्रवाशांची आतमध्ये घुसमट होत होती. दरवाजाची उघडझाप करण्यासाठी वेळ आणि प्रवाशांमुळे काही वेळा दरवाजा बंद किंवा उघडण्यास येणाऱ्या अडचणी याामुळे हा प्रयत्न त्या वेळी अयशस्वी ठरला होता. आता त्यातील त्रुटी दूर झाल्या आहेत का, हा खरा प्रश्न आहे.

मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणानंतर मध्य रेल्वेने मुंब्रा फास्टट्रॅक वळणावर रेल्वेचा वेग कमी केला आहे. कल्याण ते सीएसटीच्या दिशेने धावणाऱ्या मध्य रेल्वे सोमवारी ज्या वेगवान धावत होत्या, तो वेग आता नाही. सोमवारी झालेल्या अपघाताबद्दल मोठा दावा करण्यात आला आहे. लोकलमधील प्रवाशांनी तीन ते चार वेळा चेन खेचली होती. त्यानंतरही ट्रेन थांबली नाही. ठाण्यापासून ते कर्जत कसारापर्यंतच्या पट्ट्यातले लोक दिवसाचे अक्षरश: ४-४ तास लोकल प्रवासात खर्च करतात ते भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईमध्ये नोकरी करण्यासाठी. मुंबईची लोकल ही तिची लाइफलाइन किंवा जीवनवाहिनी मानली जाते; परंतु हीच मुंबईच्या परिघाबाहेरील प्रवाशांची मृत्यूवाहिनी आहे, हे वारंवार दिसून आले आहे. गेल्या वर्षभरातच सुमारे अडीच हजारांनी आपला जीव गमावला आहे. यामध्ये महिलांची संख्याही मोठ्या प्रमाणावर आहे. उठल्या बसल्या बहिणीला लाडके म्हणणाऱ्या सरकारमधल्या उच्चपदस्थांच्या मनात महिलांचे स्थान काय आहे हे बघायचे असेल, तर फक्त एकदा सकाळी कल्याण, डोंबिवली ते कळवा या स्थानकांदरम्यान महिलांच्या डब्यांकडे नजर टाकावी. मुंबईत १५ डब्यांच्या गाड्या वाढल्या तर थेट प्रत्येक गाडीमागे २५ टक्के प्रवासीक्षमता वाढते आणि गर्दीचा भार कमी होतो; परंतु गेल्या अनेक वर्षांमध्ये मध्य रेल्वेवर एकही १५ डब्यांची गाडी वाढवलेली नाही ही वस्तुस्थिती आहे. एसी लोकलमुळे ज्यांना परवडते, त्यांचा प्रवास सुखाचा केला खरा; पण आधीच्या साध्या गाड्यांच्या जागी एसी गाड्या आल्या. नव्या नाही आल्या. म्हणजे, सामान्य गाड्यांवरचा बोजा आणखी वाढला. मध्य रेल्वेवर एकही गाडी वेळेवर निघत नाही, तसेच एकही गाडी वेळेवर आपल्या गंतव्य स्थानी पोहोचत नाही. गाडीत चढता येत नाही म्हणून लोक उलट दिशेने प्रवास करतात. म्हणजे डोंबिवलीवाले कल्याणच्या दिशेने, कल्याणवाले अंबरनाथच्या दिशेने आणि अंबरनाथवाले बदलापूरच्या दिशेने. म्हणजे जिथून गाडी सुटणार आहे ती आधीच भरून येते. मग या लोकांच्या हाणामाऱ्या. राज्यकर्त्यांना अशा झुंजी बघायला आवडतात कारण त्यांना माहिती असते हे गाडीत आपसात भांडणारे, मारामाऱ्या करणारे शेवटी स्पिरीटशी इमान राखत रोज कणाकणाने किंवा एकदा पडून मरणार आहेत.

हे पण वाचा  एपस्टीन प्रकरणावरून ट्रम्पवरच संतापले MAGA समर्थक — देशभरात राजकीय गोंधळ

000

About The Author

Advertisement

Latest News

Advt