करवाढीच्या निषेधार्थ हॉटेल, रेस्टॉरंटचा १४ जुलै रोजी बंद
दीड लाख कोटींचा उद्योग मोडकळीस आल्याचा हॉटेल्स चालकांचा दावा
मुंबई: प्रतिनिधी
विविध करांमध्ये राज्य सरकारकडून करण्यात आलेली वाढ अवाजवी आणि हॉटेल, रेस्टॉरंट उद्योगाचे कंबरडे मोडणारी असल्याचा आरोप करून हॉटेल व्यवसायिक संघटना आहारने १४ जुलै रोजी बंद पुकारला आहे. त्यामुळे या दिवशी राज्यभरातील 20 हजाराहून अधिक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट बंद राहतील, असे आहारचे अध्यक्ष सुधाकर शेट्टी यांनी सांगितले.
मद्यावरील व्हॅट, परवाना शुल्क, उत्पादन शुल्क या सर्व करांमध्ये राज्य सरकारने भरघोस वाढ केली आहे. हॉस्पिटलिटी क्षेत्राकडून यापूर्वी अनेकदा करवाढीच्या विरोधात सरकारकडे अर्ज विनंती करण्यात आल्या आहेत. मात्र, सरकारकडून त्याच्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे ही आमच्या अस्तित्वाची लढाई बनली आहे. करवाढ कायम राहिल्यास हॉस्पिटलिटी क्षेत्र कोलमडून पडण्याच्या मार्गावर आहे, असे शेट्टी यांनी सांगितले. मद्यावरील मूल्यवर्धित करात 5 टक्क्यांवरून 10 टक्के परवाना शुल्कात 15 टक्के तर उत्पादन शुल्कात तब्बल 60 टक्के वाढ करण्यात आली आहे.
राज्यातील 20 हजाराहून अधिक परवानाधारक हॉटेल्स आणि रेस्टॉरंट तब्बल 20 लाख जणांना रोजगार उपलब्ध करून देत आहेत. तसेच 48 हजार पुरवठादारांची कुटुंब या व्यवसायांवर अवलंबून आहेत. विशेषतः पुणे मुंबई सारख्या ठिकाणी हॉस्पिटलिटी उद्योग हा पर्यटन अर्थव्यवस्थेचा कणा आहे. केंद्र सरकार एकीकडे पर्यटन क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेत असताना राज्य सरकार करवाढ करून पर्यटनाला पूरक ठरणाऱ्या हॉस्पिटलिटी उद्योगाचे कंबरडे मोडू पाहत आहे, अशी टीकाही शेट्टी यांनी केली.