- राज्य
- 'श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाची नोटीस हे दबावतंत्र?'
'श्रीकांत शिंदे यांना आयकर विभागाची नोटीस हे दबावतंत्र?'
आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली शंका
मुंबई: प्रतिनिधी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांना पाठविण्यात आलेली आयकर विभागाची नोटीस हा भारतीय जनता पक्षाच्या दबावतंत्राचा भाग आहे का, अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे.
शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी आपल्याला व श्रीकांत शिंदे यांना देखील आयकर विभागाची नोटीस आल्याचे सांगितले आहे. त्यावर बोलताना रोहित पवार यांनी दबावतंत्राची शंका उपस्थित केली आहे. केंद्रातून नोटिसीचे आम्ही बघून घेतो. तुम्ही मुंबई महापालिका निवडणूक जागा वाटपात पडती बाजू घ्या, असा दबाव एकनाथ शिंदे यांच्यावर आणण्याचा हा प्रकार असल्याची शक्यता पवार यांनी बोलून दाखवली.
एकीकडे एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याचा संबंध ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीशी जोडला जात असताना रोहित पवार यांनी त्यामागेही श्रीकांत शिंदे यांच्या आयकर नोटीसचे कारण असल्याची शक्यता वर्तवली आहे. महायुती सरकारमध्ये अंतर्गत कुरबुरी असून श्रीकांत शिंदे यांना आलेली आयकर विभागाची नोटीस हा त्यातील कुरघोडीचा प्रकार आहे का, याचा उलगडा करून घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यासारख्या बड्या नेत्यांची भेट घेतली असावी, अशी शक्यताही पवार यांनी वर्तवली आहे.
एकनाथ शिंदे यांचे पाय ओढण्याचे प्रयत्न
भारतीय जनता पक्षाचे अनेक नेते, तसेच त्यांचा मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अनेक नेते यांच्या व्यवहारांकडे बोट दाखवले जाऊ शकते. मात्र, त्यांना आयकर विभागाची नोटीस येत नाही. श्रीकांत शिंदे यांना मात्र येते. यावरून भाजपकडून एकनाथ शिंदे यांचे पाय ओढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट दिसून येते, असा आरोपही रोहित पवार यांनी केला आहे.