- राज्य
- 'वाढत्या महिला अत्याचारांवर तातडीने लक्ष देण्याची गरज'
'वाढत्या महिला अत्याचारांवर तातडीने लक्ष देण्याची गरज'
सोनाली मारणे यांनी घेतली गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट
पुणे: प्रतिनिधी:
पुणे शहरात दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याने, शिवसेनेच्या नेत्या सोनाली मारणे यांनी राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेऊन या गंभीर विषयावर चर्चा केली. त्यांनी मंत्री कदम यांच्याकडे पुणेतील महिलांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.
पुणे हे महाराष्ट्राचं सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र मानलं जातं, मात्र गेल्या काही महिन्यांत महिलांवरील अत्याचारांची वाढती संख्या या शहराची प्रतिमा मलिन करत आहे. या पार्श्वभूमीवर सोनाली मारणे यांनी गृहराज्यमंत्र्यांकडे खालील आकडेवारीसह निवेदन सादर केलं: बलात्काराचे गुन्हे (2024): ५०५, विनयभंगाचे गुन्हे (2024): ८६४, कौटुंबिक हिंसाचार: पुणे शहर राज्यात पहिल्या क्रमांकावर – २१८ गुन्हे (तुलनात्मकदृष्ट्या मुंबईत १८५ गुन्हे नोंदले गेले), एकूण गंभीर गुन्हे (2024): १२,९५४ या आकडेवारीवरून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला असून, त्वरित कारवाई आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
सोनाली मारणे यांनी महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी महत्त्वाचे उपाय सुचवले आहेत, यामध्ये कायद्याची कडक अंमलबजावणी करून गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी यासाठी तत्काळ कारवाई., पोलिसी यंत्रणा सक्षम करणे आवश्यक आहे यात महिला पोलीस पथकांची वाढ, तक्रारींवर त्वरित दखल, हेल्पलाईन क्रमांक अधिक सक्रिय करणे., महिलांना त्यांच्या हक्कांबद्दल माहिती देणे, कायद्यांची जाणीव करून देणे. अत्याचारग्रस्त महिलांसाठी मानसिक आधार व मार्गदर्शनासाठी केंद्रांची गरज असल्याचे मारणे यांनी सांगितले.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या निवेदनाची गांभीर्याने दखल घेतल्याचे समजते. पुणे पोलिसांसह संबंधित यंत्रणांना योग्य त्या सूचना देऊन लवकरात लवकर प्रभावी उपाययोजना राबवण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.