- देश-विदेश
- संशयित गुप्तहेर फेसबुकद्वारे पाकिस्तानला द्यायचा माहिती
संशयित गुप्तहेर फेसबुकद्वारे पाकिस्तानला द्यायचा माहिती
नौदलाच्या डॉकचा अभियंता एटीएसकडून जेरबंद
ठाणे: प्रतिनिधी
कळवा येथे राहणारा आणि नौदलाच्या डॉकवर कनिष्ठ अभियंता म्हणून काम करणारा रवी कुमार वर्मा याला महाराष्ट्र दहशतवाद प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. त्याने पाणबुड्या आणि युद्धनौका यांची माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा संशय आहे. ही माहिती पुरवण्यासाठी त्याने फेसबुकचा वापर केल्याचे उघड झाले आहे.
'हनी ट्रॅप'मध्ये अडकून पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारा रवी वर्मा फेसबुक द्वारे पायल शर्मा आणि इस्प्रीत या बनावट नावांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेद्वारे वापरल्या जाणाऱ्या फेसबुक अकाउंटशी नोव्हेंबर 2024 पासून संपर्कात होता. त्याने फेसबुक चॅट च्या माध्यमातून हे अकाउंट वापरणाऱ्यांना तब्बल 14 पांढऱ्या आणि युद्धनौका यांची माहिती पाठविली आहे.
नौदलाच्या डॉकवर मोबाईल वापरण्यास बंदी आहे. त्यामुळे रवी वर्मा याला पाणबुड्या आणि युद्धनौका यांची छायाचित्र घेता आली नाहीत. मात्र, या पाणबुड्या आणि युद्धनौका यांची संरचना आणि त्यावर तैनात असलेल्या यंत्रणा हे सर्व लक्षात ठेवून त्याने त्याची चित्र काढली. ही चित्र, ऑडिओ क्लिप्स आणि लिखित स्वरूपात ही सर्व माहिती त्याने फेसबुक चॅटच्या माध्यमातून पाकिस्तानला दिली आहे, असे चौकशी अंती निदर्शनास आले आहे.
हेरगिरी प्रकरणात अडकल्याने मोडले लग्न
मुलाला चांगली नोकरी असल्यामुळे रवी कुमारच्या आईने आपल्या मुलाचे काही दिवसापूर्वीच लग्न ठरविले होते. मात्र, रवी कुमार हेरगिरी प्रकरणात अडकल्याने मुलीकडच्यांनी हे लग्न करण्यास नकार दिला आहे. एटीएसने रवी कुमारला अटक केल्यानंतर त्याचे लग्न मोडले आहे.