'... तर न्यायालयालाही न जुमानता शस्त्र हाती घेऊ'
जैन समाजाचा १३ तारखेपासून उपोषण आणि आंदोलनाचा इशारा
मुंबई: प्रतिनिधी
जैन समाज हा अहिंसेला मानणारा शांतताप्रिय समाज आहे. मात्र, आमच्या धार्मिक प्रथा, परंपरा पाळण्याच्या आड येणार असाल तर प्रसंगी न्यायालयालाही न जुमानता शस्त्र हाती घेऊ, असा इशारा जैन धर्मगुरू निलेशचंद्र विजय यांनी दिला आहे.
कबुतरखाने बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने कायम ठेवल्यानंतर जैन समाजाकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे. सत्याग्रह आणि कुपोषणाच्या मार्गाने कबुतरांना खाऊ घालण्याच्या आपल्या धार्मिक आस्था, परंपरा पाळण्याचा हक्क प्राप्त करू, असे जैन समुदायाने म्हटले आहे.
आम्ही संविधानाला मानतो. न्यायालयाला मानतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानतो. मात्र, जेव्हा आमच्या धार्मिक रुढींवर गदा येईल तेव्हा आम्ही न्यायालयालाही जुमानणार नाही. कबुतरांना खायला घालण्याच्या प्रकरणात न्यायालयीन कारवाई सुरू आहे. अन्नावाचून कबुतरे मरू नयेत, असा आमचा आग्रह आहे. सरकारच्या आदेशानंतर कबुतरांना अन्न देण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे सर्व प्रकार होत आहेत, असा आरोप मुनी निलेश चद्र विजय यांनी केला.
आपला समाज अहिंसावादी आहे. आम्ही शस्त्र हाती घेत नाही. शस्त्र हाती घेणारे लोक आमचे नाही. सध्या सुरू असलेले पर्युषण पर्व संपल्यानंतर 13 तारखेला उपोषण सुरू करू. उपोषण आपण एकटे करणार नाही तर देशभरातील लाखो जैन बांधव या उपोषणात सहभागी होतील, असा इशारा जैन मुनींनी दिला.