- राज्य
- '... म्हणून शरद पवार यांना आला ओबीसींचा कळवळा'
'... म्हणून शरद पवार यांना आला ओबीसींचा कळवळा'
ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांचा आरोप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही फसवणूक केल्याचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे ओबीसी मतांची वानवा असल्यामुळेच शरद पवार यांना ओबीसींचा कळवळा आला आहे. अन्यथा सत्ता कुटुंबा बाहेर जाऊन देणाऱ्या पवारांना मंडल अशी काय देणे घेणे आहे, असाच सवाल ओबीसी नेते प्रा लक्ष्मण हाके यांनी केला आहे.
यांना मंडल यात्रा काढण्याचा अधिकार दिला कुणी?
निवडणुका जवळ आल्या की एक एक नेता पुढे येऊन ओबीसींसाठी गळा काढायला सुरुवात करतो. काल नागपूरमधून पवार यांनी काढलेली मंडल यात्रा हा त्यातलाच एक प्रकार आहे. ही यात्रा कशासाठी काढण्यात आली? त्यामागचा नेमका उद्देश काय, हे पवारांनी स्पष्ट करावे. वास्तविक त्यांचा आणि ओबीसींचा काहीही संबंध नाही. त्यांना मंडळ यात्रा काढण्याचा अधिकार दिला कोणी, असा सवालही प्रा हाके यांनी केला. ओबीसी आरक्षण नेमके कोणासाठी आहे ते पवार यांनी मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांना समजावून सांगावे, असेही ते म्हणाले.
भाजपचे ओबीसीकडे दुर्लक्ष
सत्ताधारी भाजपचे ओबीसी समाजाकडे सपशेल दुर्लक्ष होत आहे. सरकारने महाज्योतीला निधी दिला नाही. ओबीसी महामंडळाला अध्यक्ष दिला नाही. ओबीसी हा आमचा डीएनए आहे, असा दावा करणाऱ्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी समाजाची फसवणूक केली आहे. ओबीसी जर डीएनए असल्याचा तुमचा दावा असेल तर तो सिद्ध करून दाखवा. ओबीसी समाजाच्या मागण्या पंधरा दिवसाच्या आत मान्य करा. अन्यथा सर्वसामान्य ओबीसी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.