- राज्य
- कथित भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात ठाकरे गट उतरणार रस्त्यावर
कथित भ्रष्ट मंत्र्यांच्या विरोधात ठाकरे गट उतरणार रस्त्यावर
राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करणार आंदोलन
मुंबई: प्रतिनिधी
महायुती सरकारमधील कथित भ्रष्टाचारी आणि दुराचारी मंत्र्यांच्या आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात शिवसेना ठाकरे गट राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ११ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता उग्र आंदोलन करणार असल्याचे पक्षाच्या वतीने सांगण्यात आले.
विधिमंडळात रमी खेळणारे तत्कालीन कृषिमंत्री माणिकराव ठाकरे यांना क्रीडामंत्रीपद बहाल करणे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना बेताल वक्तव्याबद्दल जाबही न विचारणे, त्यांच्यावरील आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांची दखलसुद्धा न घेणे अशा बाबींचा पंचनामा या.आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावावर असलेला डान्सबार, वरिष्ठ शासकीय अधिकारी आणि मंत्री यांचे हनी ट्रॅप प्रकरण यासह 'सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचे काय जाते, सरकार भिकारी आहे,' अशी उद्दाम विधाने करणारे मंत्री पदावर कसे राहतात, यांचा जाबही सरकारला विचारण्यात येणार आहे.
भ्रष्टाचार करून पैसा मिळविणे आणि त्या पैशातून. आपल्या जवळच्या लोकांना अधिक श्रीमंत करणे, हेच अशा मंत्र्यांचे धोरण असून त्यांना सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांशी काहीही देणेघेणे नाही, असा आरोपही ठाकरे गटाच्या वतीने करण्यात आला आहे.