- राज्य
- 'पवारांकडे आलेले दोघेजण सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून शोधावे'
'पवारांकडे आलेले दोघेजण सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून शोधावे'
भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी दिले आव्हान
मुंबई: प्रतिनिधी
मतांमध्ये फेरफार करून महाविकास आघाडीला 160 जागा मिळवून देण्याची हमी देणारे ते दोघेजण कोण होते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आपल्या घरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून शोधावे आणि सर्वांच्या निदर्शनास आणून द्यावे, असे जणू आव्हानच भारतीय जनता पक्षाचे नेते माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आहे.
विधानसभा निवडणुकीपूर्वी आपल्याकडे येऊन दोघाजणांनी मतांमध्ये फेरफार करून महाविकास आघाडीच्या 160 जागा निवडून आणू, अशी खात्री दिली होती. आपण त्यांची आणि लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांची भेट करून दिली. मात्र, या मार्गाने न जाता जनतेचा कौल घेण्याचा निर्णय घेतला, असा दावा पवार यांनी केला आहे. त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना दानवे बोलत होते.
विधानसभा निवडणूक पार पडून जवळजवळ सहा महिने होत आले आहे. निवडणुकीपूर्वी घडलेल्या त्या घटनेची आठवण पवार यांना आता आली आहे. पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. ज्येष्ठ नेत्यांबद्दल आपण फारसे काही बोलत नाही. मात्र, पवार यांच्या निवासस्थानी सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. त्यातून हे दोघे कोण, ते शोधून काढून ते चित्र सर्वांसमोर आणावे, असे दानवे म्हणाले.
निवडणुकांच्या काळात निवडणूकपूर्व सर्वेक्षण करणाऱ्या संस्थांचे (सर्व्हे एजन्सी) लोक सर्वच पक्षाच्या नेत्यांकडे येऊन सर्वेक्षणाचे काम मिळवण्याचा प्रयत्न करतात. त्यात तुमच्या पक्षाला ठराविक एवढ्या जागा देऊ, असे सांगतात. अनेक उमेदवारांकडे देखील व्यक्तीशः असे लोक जातात. त्यांनाही तुम्ही निवडून याल, असा अहवाल देण्याचे मान्य करतात. पवार यांच्याकडे आलेले लोक हे अशा एजन्सीचेच लोक असावे, अशी शक्यता देखील दानवे यांनी व्यक्त केली.
निकाल अजून नाही पचनी पडत
विधानसभा निवडणुकांचा निकाल विरोधकांच्या अजूनही पचनी पडत नाही. त्यामुळे ते रोज उठून नवीन आरोप करीत आहेत. सुरुवातीला मतदान यंत्रावर आरोप केला. मग मतदार याद्यांवर आरोप केला. मतदानाच्या शेवटच्या टप्प्यात वाढलेल्या मतदानावार आरोप केला. हा आता चौथा नवीन आरोप आहे. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पूर्ण बहुमताने सत्तेवर आले असून लोकांची नजर आता विकासाकडे लागली आहे. त्यांना विचलित करण्यासाठी अशा प्रकारचे आरोप केले जात आहेत, अशी टीकाही दानवे यांनी केली.