- देश-विदेश
- 'चीन, रशिया प्रमाणे नको त्या नेत्यांना गायब करता का?'
'चीन, रशिया प्रमाणे नको त्या नेत्यांना गायब करता का?'
जगदीप धनखड बेपत्ता, संजय राऊत यांचा सरकारवर हल्लाबोल
नवी दिल्ली: प्रतिनिधी
देशाच्या उपराष्ट्रपतींचे बेपत्ता होणे हे कोणत्याही लोकशाही देशाच्या प्रतिमेला शोभणारे नाही, अशी टीका करतानाच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, चीन आणि रशिया प्रमाणे आपल्याला नको असलेले नेते गायब करण्याची पद्धत भारतात सुरू केली आहे काय, असा सवाल त्यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे.
जगदीप धनखड यांचा राजीनामा घेतल्यापासून ते गायब आहेत. ते कुठे आहेत, कोणाबरोबर आहेत, त्यांची प्रकृती कशी आहे याबद्दल कोणालाही काहीही माहिती नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी शिवसेना ठाकरे गटाचे कार्यप्रमुख उद्धव ठाकरे दिल्ली दौऱ्यावर असताना झालेल्या भेटीत ही बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली.
धनखड यांच्याबरोबर त्वरित माहिती मिळू शकली नाही तर हेबीअस कॉर्पस कायद्यांतर्गत सर्वोच्च न्यायालयाकडे त्यांच्या तपासासाठी मागणी करण्याचा निर्णय इंडिया आघाडीच्या वतीने घेण्यात येईल, असा इशाराही राऊत यांनी दिला.
कबुतरखाने बंद करण्याच्या प्रश्नावरून मुंबईमध्ये तणाव निर्माण झालेला असताना जैन समाजाच्या महिला हातात चाकू घेऊन आंदोलन करत असताना दिसल्या. वास्तविक जैन समाज हा अहिंसक आणि संयमी समाज आहे. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी या समाजाला हिंसक बनवण्याचे काम केले आहे, असा आरोपही राऊत यांनी केला.