- राज्य
- '... तर गृहमंत्र्यांच्या तोंडालाही लागेल काळे'
'... तर गृहमंत्र्यांच्या तोंडालाही लागेल काळे'
महादेव मुंडे हत्या प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांचा इशारा
अहिल्यानगर: प्रतिनिधी
परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात सहभागी असलेल्या प्रत्येकाला फासावर लटकवले पाहिजे. त्यातून कोणालाही सुट्टी नाही. जर दोषी असून कोणाला वाचवण्याचा प्रयत्न केला तर गृहमंत्र्यांच्या तोंडालाही काळे लागेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
रक्षाबंधनाच्या दिवशी महादेव मुंडे यांच्या विधवा पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी येथे येऊन जरांगे यांना राखी बांधली. यावेळी मुंडे कुटुंबीयांनी जरांगे यांच्याशी तब्बल अर्धा तास चर्चा केली. त्यानंतर जरांगे पत्रकारांशी बोलत होते.
महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस अधिकारी पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक स्थापन केले आहे. हे पथक स्थापन होऊन पाच-सहा दिवसच झाले आहेत. त्यांना तपासासाठी आणि आरोपींपर्यंत पोहोचण्यासाठी वेळ देणे आवश्यक आहे. कुमावत यांच्याकडून निश्चितपणे योग्य पद्धतीने तपास केला जाईल, असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला.
या हत्या प्रकरणात आत्तापर्यंत एकाही आरोपीला अटक झाली नसल्याच्या निषेधार्थ एका दिवसात बीड बंद करणे शक्य आहे. त्यासाठी बीड शहर आणि जिल्ह्यातील मराठा व अन्य जाती-धर्माचा समाज सज्ज आहे. ज्ञानेश्वरी मुंडे यांना न्याय मिळावा, अशीच सर्वांची भावना आहे. मात्र, आत्ता आंदोलन केल्याने विशेष तपास पथकावर तणाव येऊन तपासावर परिणाम होऊ शकतो, असेही जरांगे म्हणाले.
कुमावत यांचे जरांगे यांनी विशेष कौतुक केले. कुमावत हे धडाडीचे आणि निस्पृह अधिकारी आहेत. ते कोणत्याही गुंडाचा बंदोबस्त करण्यास सक्षम आहेत. कारवाई करताना ते गुन्हेगाराची पार्श्वभूमी, त्याचे राजकीय अथवा सामाजिक वजन याचा विचार करत नाहीत. राजकारण्यांचा दबाव सहन करत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून या प्रकरणात निश्चित योग्य दिशेने तपास होईल, असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केला.