- राज्य
- 'हिंदीची सक्ती ही मुंबई महाराष्ट्र पासून वेगळी काढण्याची चाचपणी'
'हिंदीची सक्ती ही मुंबई महाराष्ट्र पासून वेगळी काढण्याची चाचपणी'
विजय सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी
राज्य सरकारकडून त्रिभाषा सूत्राच्या नावाखाली करण्यात आलेली हिंदीची सक्ती ही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी काढण्यासाठीची चाचपणी असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला.
विद्यार्थ्यांना मराठी आणि इंग्रजीबरोबरच हिंदी भाषा शिकणे अनिवार्य करणारे दोन आदेश राज्य सरकारने निर्गमित केले होते. मात्र, राजकीय विरोधकांसह सर्वच स्तरातून या निर्णयाला विरोध होत असल्याचे पाहून हा निर्णय रद्द करण्यात आला. याबद्दल आयोजित करण्यात आलेल्या विजयसभेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र व्यासपीठावर होते. ठाकरे बंधूंना एकत्र पाहण्यासाठी वरळी डोम येथे प्रचंड गर्दी उसळली. मराठीच्या संरक्षणासाठी एकजूट कायम राखण्याचा निर्धार या सभेत व्यक्त करण्यात आला.
आपला विरोध हिंदीला नाही. कोणतीही भाषा श्रेष्ठच असते. एखादी भाषा, एखादी लिपी घडविण्यासाठी खूप ताकद लागते. अनेक पिढ्यांचे कष्ट त्याच्यामागे असतात. आपला विरोध सक्तीला आहे, असे स्पष्ट करतानाच राज ठाकरे यांनी, राज्यकर्त्यांनी शिक्षणतज्ञांना अथवा अन्य कोणालाही न विचारता ही सक्ती लागल्याचा आरोप केला.
तुमच्याकडे बहुमत आहे, सत्ता आहे म्हणून तुम्ही काहीही लादणार, असा सवाल राज्यकर्त्यांना करून राज म्हणाले की, तुमची सत्ता विधानभवनात! रस्त्यावरती आमची सत्ता आहे. दक्षिणेतली कोणतीही राज्य सत्ताधाऱ्यांना हिंग लावून विचारत नाहीत. त्यामुळे त्यांनी त्रिभाषा सूत्राचा प्रयोग महाराष्ट्रात करून बघितला. मात्र, महाराष्ट्र पेटून उठला की काय होतं, हे त्यांना कळून चुकले आहे, असेही ते म्हणाले.
या कार्यक्रमात आमच्या भाषणांपेक्षा आम्ही एकत्र दिसलो हे महत्त्वाचे आहे. आमच्या दोघांमधला अंतरपाट अनाजीपंतांनी दूर केला आहे. आता मी एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठीच, असे समजावे उद्धव ठाकरे म्हणाले की, सत्ताधाऱ्यांनी कितीही समित्या नेमल्या तरीही हिंदीची सक्ती आम्ही मान्य करणार नाही. भाषेचा विषय किरकोळी घेऊ नका, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
आम्ही दोघे मिळून तुम्हाला फेकून देऊ
तोडा, फोडा आणि राज्य करा, हे सत्ताधाऱ्यांचे धोरण आहे. मराठी माणूस एकमेकांशी भांडला आणि दिल्लीचे गुलाम आपल्या डोक्यावर आले. मात्र, या पुढील काळात मराठी माणसाची एकजूट कायम राहील. आत्तापर्यंत वापरा आणि फेकून द्या, हे सत्ताधाऱ्यांचे धोरण राहिले आहे. याचा अनुभव आम्ही आणि राज यांनी देखील घेतला आहे. मात्र, या पुढील काळात आम्ही दोघे मिळून तुम्हाला फेकून देऊ, असा इशाराही उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना दिला. सत्ताधाऱ्यांकडून, यांचा म मराठीचा नाही, तर महापालिकेचा आहे, असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. आमचा म केवळ महापालिकेचाच नाही तर महाराष्ट्राचा आहे, असा दावाही उद्धव ठाकरे यांनी केला. महाराष्ट्र, मराठी आणि मराठी माणूस यामध्ये कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असे सांगतानाच त्यांनी एकजूट कायम राखण्याचे आवाहन मराठी माणसाला केले.
बाळासाहेबांना देखील जे जमले नाही...
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून अनेक जणांना, आम्हा दोघांना एकत्र आणणे जमले नाही. ते काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवले आहे, अशी मिश्किल टिप्पणी राज ठाकरे यांनी केली.