- राज्य
- 'आनंद साजरा करतानाच जबाबदारीचे भान ठेवा'
'आनंद साजरा करतानाच जबाबदारीचे भान ठेवा'
राज ठाकरे यांनी राज्य सरकारला सुनावले
मुंबई: प्रतिनिधी
जागतिक वारसा यादीत सहभागी झालेल्या स्थळांच्या देखभालीबाबत काटेकोर निकषांचे पालन करावे लागते. अन्यथा अशी स्थळे जागतिक वारसा यादीतून वगळली देखील जातात. जगात अशी दोन उदाहरणे आहेत. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्याचा आनंद साजरा करताना त्याबद्दलच्या जबाबदारीचे देखील भान ठेवा, अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी राज्य सरकारला सुनावले आहे.
छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातील अकरा आणि तामिळनाडूतील जिंजी या एका किल्ल्याचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश झाल्याचा आनंदच आहे. यामुळे छत्रपती शिवरायांचा स्वराज्याचा विचार कुठपर्यंत पोहोचला होता, मराठी आणि तमिळ भाषा आणि संस्कृती यांच्यातील सेतुबंध किती जुने आणि जवळचे होते ते लक्षात येईल, असे ठाकरे यांनी समाजमाध्यमात प्रसिद्ध केलेल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे
आतापर्यंतच्या सर्व सरकारांनी राज्यातील गडकोटांची पूर्ण दुरवस्था करून टाकली. त्यामुळे जगाला बोलावून आमचे गड किल्ले दाखवावे, समृद्ध इतिहासाचे साक्षीदार त्यांच्या पुढे आणावे, अशी परिस्थिती नव्हती. आता ही परिस्थिती बदलेल, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
महाराजांच्या किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा स्थळात झाल्यामुळे राज्य सरकारला त्यांच्या देखभाल, दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध होईल. सरकारनेही या कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून द्यावा आणि राज्यातील किल्ले सुस्थितीत आणावे. आम्ही पूर्वीपासून सांगत आहोत की ऐतिहासिक वारसा असलेले राज्यातील किल्ले आणि समुद्र किनारपट्टी याची योग्य देखभाल केली, त्या ठिकाणी पर्यटनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या तर पर्यटनाच्या माध्यमातून राज्याची अर्थव्यवस्था मोठी भरारी घेऊ शकते.
जागतिक वारसा स्थळांच्या यादीत टिकून राहण्यासाठी लेखभाल दुरुस्तीचे काटेकोर नियम पाळावे लागतात. अन्यथा यादीतून संबंधित स्थळांना वगळण्यात आल्याचीही उदाहरणे आहेत. ओमान येथील अरेबियन आवरिक्स अभयारण्य आणि जर्मनी येथील ड्रेस्डन व्हॅली या दोन स्थळांचा समावेश जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला. मात्र, देखभाल दुरुस्तीच्या निकषात पात्र राहताना आल्यामुळे या दोन्ही ठिकाणांचा समावेश रद्द करण्यात आला. याबाबत विशेष काळजी घेण्याचा सल्लाही राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे.