- राज्य
- 'स्थानिक निवडणुकीत इंडी, महाविकास आघाडीची गरज नाही'
'स्थानिक निवडणुकीत इंडी, महाविकास आघाडीची गरज नाही'
ठाकरे गट व मनसे युतीसाठी जनतेचा दबाव असल्याचा राऊत यांचा दावा
मुंबई: प्रतिनिधी
स्थानिक निवडणुकीत इंडी आघाडी अथवा महाविकास आघाडी यांची काहीही गरज नाही. या निवडणुकीत स्थानिक मुद्द्यांना महत्त्व असल्याने त्याबाबतचा निर्णय स्थानिक नेतृत्वावर. सोपवावा, असे मत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले. या स्थानिक स्वराज्य संस्था, विशेषतः मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने एकत्र लढवावी, यासाठी जनतेकडून दबाव आहे आणि तो विजय मेळाव्यात दिसून आला आहे, असा दावाही त्यांनी केला.
मराठी विजय मेळाव्यात बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी, एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठी, असे विधान करीत युतीबाबत सूतोवाच केले आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे मात्र सावध पवित्र्यात आहेत. पूर्वपरवानगीशिवाय संभाव्य युतीबाबत कोणतेही विधान न करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.
यामुळे संभाव्य युतीबाबतच्या संभ्रमावस्थेबद्दल विचारले असता राऊत म्हणाले की, मुंबईला वाचवायचे असेल तर राज आणि उद्धव ठाकरे यांना एकत्रित महापालिका निवडणूक लढवावी लागेल, अशी जनतेची मानसिकता आहे आणि त्यासाठी त्यांच्याकडून दबावही आहे.
राज ठाकरे यांनी युतीबाबत बोलण्यास घातलेल्या निर्बंधांबद्दल बोलताना ते म्हणाले की, प्रत्येकाची काही कार्यशैली असते. हे निर्बंध हा त्यांच्या कार्यशैलीचा भाग असेल. आम्ही सगळे उघडपणे बोलून टाकतो. ती त्यांची कार्यपद्धती नसेल. मात्र, लवकरच सर्व बाबी स्पष्ट होतील, असे राऊत म्हणाले.
... आणि देश सुरक्षित हाती सोपवा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या पंचाहत्तरी बाबतच्या विधानाबद्दल बोलताना राऊत म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्टेंबर महिन्यात ७५ वर्षांचे होत आहेत. या वयात निवृत्त व्हावे, या संघाच्या व खुद्द मोदी यांच्या नियमाची संघ मोदी यांना वारंवार आठवण करून देत आहे. तुम्हाला आता निवृत्त व्हावे लागेल. सत्तेची सुख. उपभोगून झाली. जग फिरून झाले. आता बाजूला व्हा आणि देश सुरक्षित हाती सोपवा, असा सल्लाही राऊत यांनी मोदी यांना दिला. मोदी यांनी स्वतःचा मार्ग मोकळा करण्यासाठी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, जसवंत सिंह अशा अनेक ज्येष्ठांना निवृत्त केल्याचा आरोपही त्यांनी केला.