- राज्य
- 'छत्रपती शिवरायांना देव्हाऱ्यात बसवून अपमानित करू नका'
'छत्रपती शिवरायांना देव्हाऱ्यात बसवून अपमानित करू नका'
शिवप्रेमी अनिल जेधे यांचे कळकळीचे आवाहन
पुणे: प्रतिनिधी
आपल्या अफाट कर्तृत्व आणि नेतृत्व गुणांचा आदर्श अखिल मानवजातीसमोर उभा करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना देवत्व बहाल करून देव्हाऱ्यात बसवू नका. त्यांची मंदिरे उभारून देव म्हणून पूजा करू नका. तो त्यांचा अवमान ठरेल. पूजाच करायची तर त्यांच्या गुणांची करा, असे कळकळीचे आवाहन सरदार कान्होजी जेधे देशमुख यांचे वंशज, शिवप्रेमी अनिल जेधे यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या माता पित्यांपासून प्रेरणा घेऊन अफाट कर्तृत्व, नेतृत्व आणि ध्येयासक्तीने हिंदवी स्वराज्य उभे केले. त्यांना देवत्व दिल्यास त्यांच्या कर्तृत्वाचे स्थान शून्यवत होऊन त्याचे श्रेय दैवी शक्तींना जाते. त्यामुळे त्यांच्या गुणांपासून प्रेरणा घेऊन त्यांचे यथाशक्ती अनुसरण करण्याची शक्यताच संपुष्टात येते. मुख्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांना देवत्व दिल्यास काही पिढ्यानंतर ते काल्पनिक असल्याची कंडी पिकवली जाण्याची भीती आहे, हे जेधे यांनी निदर्शनास आणून दिले.
शासनाने अधिकृत चरित्र प्रसिद्ध करावे
सध्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाचे मोठ्या प्रमाणावर विकृतीकरण झाले आहे. त्यामुळे अनेक वाद उद्भवत आहेत. समाजात संभ्रम निर्माण होत आहेत. हे टाळण्यासाठी इतिहास संशोधकांची समिती नियुक्त करून शासनाने वस्तुनिष्ठ इतिहास मांडणारे अधिकृत शिवचरित्र प्रसिद्ध करावे, अशी मागणीही जेधे यांनी केली.
गडकिल्ले संवर्धनासाठी महामंडळ स्थापन करावे
मराठ्यांच्या दैदिप्यमान इतिहासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेल्या गडकिल्ल्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करण्यात यावी, अशीही जेधे यांची मागणी आहे. सध्या शासनाकडून काही ठराविक किल्ल्यांकडे लक्ष दिले जात आहे. मात्र, राज्यभरातील सर्वच गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व मोठे आहे. त्यामुळे महामंडळ स्थापन करून सर्व किल्ल्यांचे सर्वेक्षण करून त्यांच्या संवर्धनाची जबाबदारी महामंडळावर सोपविण्यात यावी, अशी सूचना जेधे यांनी केली.
शिलेदार वीर कान्होजीराजे जेधे प्रतिष्ठानचे कार्य
मराठ्यांचा खरा इतिहास समाजासमोर आणणे, गडकिल्ल्यांची माहिती करून देणे अशा प्रमुख उद्दिष्टांना नजरेसमोर ठेऊन शिलेदार वीर कान्होजीराजे जेधे प्रतिष्ठानची स्थापना जेधे यांनी केली आहे. सुरुवातीच्या काळात 50 ते 100 शिवप्रेमींना घेऊन स्वखर्चाने राज्यातील विविध गडांना भेटी देण्याचा उपक्रम प्रतिष्ठानने सुरू केला. या गड मोहिमांमध्ये गडांची स्वच्छता, वृक्षारोपण अशी कामे केली जातात. त्याचप्रमाणे ज्या गडावर मोहीम असेल त्या गडाची संपूर्ण ऐतिहासिक माहिती, तिथे घडलेल्या महत्त्वाच्या घटना, त्या किल्ल्याचे ऐतिहासिक आणि सामरिक महत्त्व सांगणारी व्याख्याने गडावरच आयोजित केली जातात. अशाप्रकारे गडावर व्याख्याने आयोजित करण्याचे उपक्रम प्रतिष्ठानने प्रथम सुरू केले. आता त्याचे अनुकरण अनेक संस्था करीत आहेत, असे जेधे यांनी सांगितले.