- राज्य
- 'देशाची न्यायव्यवस्था ताब्यात ठेवण्याचे मोदी शहा यांचे कारस्थान'
'देशाची न्यायव्यवस्था ताब्यात ठेवण्याचे मोदी शहा यांचे कारस्थान'
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी
देशातील न्यायव्यवस्थेसह सर्व घटनात्मक संस्था आपल्या ताब्यात ठेवण्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचा डाव असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
भारतीय जनता पक्षाच्या प्रवक्त्या आरती साठे यांची मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदी नेमणूक झाल्याबाबत राऊत यांनी तीव्र आक्षेप नोंदविला. आपला कोणावरही व्यक्तिगत आकस नाही. मात्र, ज्या व्यक्तीने प्रवक्ता म्हणून मोदी आणि शहा यांच्या चुकीच्या भूमिकेची तरफदारी केली आहे अशा व्यक्तीची न्यायाधीश पदी नेमणूक करणे हे मुंबई उच्च न्यायालयाच्या उज्ज्वल परंपरेला काळमा फासणारे आहे, अशी टीका राऊत यांनी केली.
मुंबई उच्च न्यायालयात भाजप किंवा संघ परिवाराशी संबंधित पाच ते सहा न्यायाधीश आहेत. ते स्वतः कधीकाळी संघाच्या शाखेत गेले होते किंवा त्यांचे कुटुंब संघाशी संबंधित आहे. अशाच लोकांना सर्वोच्च न्यायालयात पाठवून न्याय संस्था ताब्यात घेणे, हे मोदी आणि शहा यांचे उद्दिष्ट आहे, असा आरोप राऊत यांनी केला.
देशातील सर्व घटनात्मक संस्था आपल्या गुलाम असाव्या यासाठी निवडणूक आयोगापासून न्यायालयापर्यंत सर्व ठिकाणी संघ परिवारातील माणसे नेमण्याचे काम मोदी आणि शहा यांच्याकडून केले जात असून ते देशातील लोकशाहीसाठी घातक आहे, असे राऊत यांनी नमूद केले.