- राज्य
- 'राज ठाकरे यांच्या विरोधात अवाक्षरही काढू नका'
'राज ठाकरे यांच्या विरोधात अवाक्षरही काढू नका'
एकनाथ शिंदे यांचे. नेत्या, कार्यकर्त्यांना आदेश
मुंबई: प्रतिनिधी
मराठी विजय मेळाव्यात ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर महायुतीच्या नेत्यांकडून दोघांनाही टीकेचे लक्ष्य करण्यात येत आहे. मात्र, शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या विरोधात अवाक्षरही काढू नका, असे आदेश आपल्या नेत्या, कार्यकर्त्यांना दिले आहेत.
राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीला विरोध करताना सातत्याने 'ना पक्ष ना झेंडा, फक्त मराठी हाच अजेंडा,' ही भूमिका घेतली आहे. मेळाव्यात बोलताना त्यांनी कुठेही आपल्या विरोधात भूमिका घेतलेली नाही किंवा वक्तव्य केले नाही. त्यामुळे त्यांच्या विरोधात बोलण्याचे काहीच कारण नाही, असे शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे यांनी मात्र या मेळाव्यात हिंदी सक्ती, मराठीचा आग्रह हे मुद्दे बाजूला ठेवत अत्यंत हीन दर्जाचे भाषण केले. मुंबई महापालिका, महापालिकेची तिजोरी डोळ्यासमोर ठेवून ते बोलले. पातळी सोडून टीका केली. ते आधीच हरल्याचे त्यांच्या वक्तव्यावरून दिसून आले. त्यांच्यावर आम्ही टीकेची झोड उठवू, असे म्हस्के यांनी स्पष्ट केले.